धक्कादायक...! हिंगोलीत एकाच दिवशी सहाजणांचे अहवाल पॉझिटिव्ह

corona
corona

हिंगोली ः मुंबई आणि मालेगाव येथून बंदोबस्तावरून परतलेल्या १९२ जवानांपैकी हिंगोली राज्य राखीव दलाचे चार जवान ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आढळल्याचे सोमवारी (ता.२७) सकाळी प्रशासनाने सांगितले. यानंतर बारा तासांच्या आत सायंकाळी सातला आलेल्या अहवालात अन्य एक जवान आणि मागील दोन दिवसांपूर्वी जालना येथे कार्यरत मात्र, हिंगोली जिल्ह्यात गाव असलेल्या जवानाच्या निकटतम संपर्कातील अन्य एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकितस्क डॉ.किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली. एकाच दिवशी जिल्ह्यात पाच जवानांसह अन्य एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सोमवारची बाधित संख्या सहा, तर एकूण संख्या आता तेरावर पोचली आहे.

जिल्ह्यातून मुंबई व मालेगाव येथे बंदोबस्तासाठी गेलेल्या १९२ जवानांचे परतल्यावर स्‍वॅब नमुने औरंगाबाद येथे सोमवारी (ता.२०) तपासणीसाठी पाठविले होते. त्या सर्वांना क्वारंटाइनमध्ये ठेवले आहे. या आधीचे सहा आणि नंतरचा एक, असे सात जवान यापूर्वी बाधित झाले आहेत. त्यातच चार जवानांना ‘कोरोना’ची लागण झाल्याचा अहवाल औरंगाबाद येथील शासकीय महाविद्यालयातून जिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवारी सकाळी (ता.२७) प्राप्त झाला. या चार जवानांना एसआरपीएफ अंतर्गत तयार केलेल्या क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले. 

सकाळी चार तर सायंकाळी दोनजण पॉझिटिव्ह  
या सर्व जवानांचा पहिला तपासणी अहवाल निगेटिव्ह आला होता. तर यापैकी तीन जवानांना (ता.२३) ताप, सर्दी, खोकला आल्यामुळे सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात भरती केले होते. एका जवानावर पुन्हा शुक्रवारी (ता.२४) आयसोलेशन वॉर्डात भरती करून उपचार सुरु होते. त्यानंतर या चार जवानांचे थ्रोट स्वॅब अहवाल शनिवारी (ता.२५) घेण्यात आले. त्यांचा अहवाल सोमवारी सकाळी (ता.२७) प्राप्त झाला असून चार जवान पॉझिटिव्ह आले. तर सोमवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात एक जवान आणि अन्य एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे प्रशासनाने सांगितले. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात कोरोनाबाधितांची संख्या १३ झाली आहे.

४६ जणांनाही रुग्णालयात केले क्वारंटाइन
प्रशासनाने ‘कोरोना’बाधित जवानांच्या संपर्कात आलेल्या ४६ जणांनाही रुग्णालयात क्वारंटाइन केले आहे. जिल्ह्यात आढळलेला पहिला ‘कोरोना’बाधित रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतला असतानाच पुन्हा सात जवान कोरोना बाधित आढळले. आता त्यात सोमवारी आणखी पाच जवानांसह अन्य एकाची भर पडली आहे.

आंध्रप्रदेशचे २८ लोक वसमतला आढळले
वसमत ः जालना येथून विजयवाडा (आंध्रप्रदेश) जाण्यासाठी निघालेले २८ लोक वसमत येथे सापडले. दरम्यान, शहर पोलिसांनी त्यांना तहसिल प्रशासनाच्या स्वाधीन केले असून त्यांना नूतन केंद्रीय प्राथमिक शाळा जिल्हा परिषद मैदान येथे वेगळे थांबवले आहे. मूळचे विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथील असलेले २८ जण एका वाहनाने जालन्याहुन विजयवाडाला जाण्यासाठी निघाले असता सदर वाहन चालकाने या लोकांना वसमत रेल्वेस्थानक येथे सोडून तेथून पसार झाल्याने सर्व लोक शहरातून पायी फिरत असल्याची माहिती मिळाल्याने शहर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत तहसिल प्रशासनाच्या स्वाधीन केले. त्यांना तात्पुरत्या स्वरूपात नूतन शाळा जिल्हा परिषद मैदान येथे थांबवले असून या बाबत वरिष्ठांना माहिती देण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांनी सांगितले. पुढील आदेश आल्यानंतर या लोकांना त्यांच्या गावाकडे जाण्याची मुभा देण्यात येते की वसमत येथेच क्वारंटाइन करून ठेवण्यात येईल, या बाबत अजून निर्णय झाला नाही. वसमत येथे याआधीच अनेक जण दोन ठिकाणी क्वारंटाइन असून आता २८ जणांची भर पडल्यास  प्रशासनाचा ताण वाढणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com