esakal | लातुरात सील केलेल्या दुकानाची अखेर झडती
sakal

बोलून बातमी शोधा

प्रतिकात्मक छायाचित्र

बेकायदा सावकारीवरून सहकार विभागाची दुसऱ्या दिवशीही कारवाई 

लातुरात सील केलेल्या दुकानाची अखेर झडती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लातूर : बेकायदा सावकारी व्यवहाराच्या संशयावरून सहकार विभागाच्या पथकाने मार्केटयार्डातील अडत व्यापाऱ्याच्या शुक्रवारी (ता. 23) सील केलेल्या दुकानाची शनिवारी (ता. 24) सकाळी झडती घेतली. झडतीच्या धास्तीने दुकानाकडे न फिरकलेला व्यापारी शनिवारी सकाळीच दुकानासमोर हजर झाला व त्याने पथकाची दीड तास प्रतीक्षा केली. त्यानंतर पथकाने दुकानाची झडती घेतली. त्यानंतर हा व्यापारी खत विक्रेता नसून अडत व्यापारी असल्याचा साक्षात्कारही पथकाला झाला. सलग दुसऱ्या दिवशी केलेल्या कारवाईत पथकाच्या हाती दोन डायऱ्या लागल्याची माहिती मिळाली. 


मार्केटयार्डात अडत दुकान असलेल्या एका व्यापाऱ्याविरुद्ध बेकायदा सावकारी व्यवसाय करून लोकांची पिळवणूक करत असल्याची तक्रार सहकार विभागाकडे आली होती. त्यानुसार सहकार विभागाच्या पथकाने शुक्रवारी व्यापाऱ्याच्या दुकान व घरावर छापा टाकला. यात झडतीची माहिती होताच व्यापाऱ्याने दुकान न उघडल्याने पथकाने दुकान सील करून घरावर छापा टाकला. मात्र, व्यापाऱ्याच्या मुलीने आतून दार बंद करून घेत चार तास पथकाला घरात येऊ दिले नाही. पोलिस बंदोबस्त गेलेले पथक ताटकळले. चार तासांनंतर मुलीने दरवाजा उघडला व त्यानंतर पथकाने घराची झडती घेतली. झडतीत बेकायदा सावकारी व्यवसायाशी संबंधित काही आक्षेपार्ह कागदपत्र पथकाच्या हाती लागल्याचे वृत्त आहे. दरम्यान, सील केलेल्या दुकानाची झडती घेण्यासाठी व्यापारी हजर राहिले नाही तर कुलूप तोडून झडती घेण्याची तयारी पथकाने केली होती.

मात्र, व्यापारी बाजारपेठेचे व्यवहार सुरू होण्यापूर्वीच सकाळी दुकानासमोर हजर झाला. त्यानंतर पथकाने जाऊन दुकानाची झडती घेतली. यात पथकाच्या हाती दोन डायऱ्या हाती लागल्या तरी त्या बेकायदा सावकारी व्यवसायाशी निगडित असल्याची खातरजमा झाली नाही. सलग दुसऱ्या दिवशी सहकार विभागाच्या कारवाईमुळे बेकायदा सावकारी करणाऱ्यांनी धास्ती घेतली आहे. 

चार तासांत गठ्ठे गायब 
दरम्यान, चार तास दार बंद करून बेकायदा सावकारी व्यवसायाशी निगडित महत्त्वाची कागदपत्रे असलेले गठ्ठे व्यापाऱ्याच्या मुलीने बाजूच्या घरातून दुसऱ्या घरात लांबविल्याची चर्चा होत आहे. यामुळेच पथकाच्या हाती तेवढे महत्त्वाचे काही लागले नसल्याचे वृत्त आहे. दरम्यान, व्यापाऱ्याचे बीड येथील नातेवाईक मंडळी शनिवारी शहरात दाखल होऊन सहकार विभागाच्या बीडचे मूळ रहिवासी असलेल्या अधिकाऱ्याचा दिवसभर पाठलाग करीत असल्याचे दिसून आले.  
 

loading image
go to top