
हिंदू धर्मामध्ये शिवभक्तांना श्रावणमास म्हणजे एक पर्वणी असते. देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग शहरात असल्याने तालुक्यात संपूर्ण महिनाभर विविध मंदिरात धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात
Shravan 2021: इतिहासात परळीचे प्रभू वैद्यनाथ मंदिर दुसऱ्यांदा बंद
परळी वैजनाथ (बीड): येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या इतिहासात दुसऱ्यांदा श्रावण महिन्यातील सोमवारी वैद्यनाथ मंदिर बंद आहे. श्रावणातील सोमवारी लाखों शिवभक्त विविध राज्यातून प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी येवून अभिषेक, बेल- पुजा, आरती करत असतात. यंदाही कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मंदिर बंद असल्याने शिवभक्त पायरीचे दर्शन घेऊन जात आहेत.
हिंदू धर्मामध्ये शिवभक्तांना श्रावणमास म्हणजे एक पर्वणी असते. देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग शहरात असल्याने तालुक्यात संपूर्ण महिनाभर विविध मंदिरात धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. श्रावणातील सोमवारी प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी लाखों भाविक भक्त येथे येत असतात. संपूर्ण शहरात शिवभक्तांची मांदियाळी असते. वैद्यनाथ मंदिरासह सर्व शिवालये भक्तांनी गजबजलेली असतात. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्चपासून बंद झालेले मंदिर श्रावणातही बंद आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गर्दी होणारी सर्व ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. यामध्ये सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे बंद करण्यात आलेली आहेत.
काही राज्यात नियम व अटी घालून प्रार्थनास्थळे उघडण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. पण महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोणत्याही धर्माच्या प्रार्थनास्थळांना उघडण्याची परवानगी देण्यात आलेली नसल्याने श्रावणामास सुरू झालेला असताना श्रावणातील पहिल्या सोमवारी प्रभू वैद्यनाथाचे मंदिर बंद असल्याने काही शहरातील नित्य नियमाने दर्शन घेणारे भक्त वैद्यनाथाच्या पायरीचे दर्शन घेत आहेत. गेल्या चार महिन्यांपासून मंदिर बंद असल्याने वैद्यनाथ मंदिरासह परिसरातील अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांसह पुरोहितांचे पण आर्थिक नुकसान झाले आहे. कारण महिनाभर लाखों भाविक भक्त देशातील विविध भागातून येत असल्याने मंदिर परिसरात, तसेच शहरातील व्यवसाईकांना या पर्यटकांमुळे आर्थिक फायदा होतो. पण यंदा गेल्या चार महिन्यांपासून मंदिरासह पर्यटन बंद असल्याने शहरातील लहान मोठ्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. श्रावण महिना असताना मंदिर परिसर सुना-सुना झाला आहे.
दरवर्षी श्रावण महिन्यात तालुक्यातील गावात जवळच असलेल्या गंगेचे पाणी आणून शिवभक्त अभिषेक, पुजा, आरती करत असतात. गावात यासाठी एका माणसाची नेमणूक केली जाते. रोज एकाच्या घरी हा भोपळा ठेवला जातो. ज्यांच्याकडे हा भोपळा ठेवला आहे. त्यांनी सोनपेठ किंवा गंगाखेड येथे जाऊन गंगेचे पाणी आणायचे व गावातील सर्व देवांना घालण्याची प्रथा गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. तसेच वैद्यनाथ मंदिरात या गंगेचे पाण्याच्या अनेक कावडी पाणी घेऊन येवून गंगेच्या पाण्याचा जलाभिषेक करण्याचीही परंपरा येथे आहे. मंदिरे बंद असल्याने या परंपरेलाही यंदा खंड पडला आहे.
राज्यातील मंदिरे उघडण्याची भाविकांची मागणी-
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. यामुळे सर्व व्यवहार सुरू करण्यात आले आहेत. ८ वी ते १२ वीचे वर्गही सुरू करण्यात आले आहेत. सर्व काही सुरू करण्यात आले आहेत. मग मंदिरे उघडण्याची परवानगी का नाही ? मंदिरातील दर्शनामुळेच कोरोना वाढतो व इतर ठिकाणी ऐवढी गर्दी होत आहे तिथे वाढत नाही का ? असा प्रश्न भाविकांना पडला आहे. जे काही नियम लावायचे ते लावा पण मंदिराची दारे उघडा अशी आर्त हाक भाविक जिव्हेश्वर महिला मंडळाच्या स्वाती ताटे व शिवभक्तांनी शासनाकडे केली आहे.