छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

गणेश पांडे 
Friday, 19 February 2021

येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळा परिसरात गेल्या चार दिवसांपासून काही संघटनांनी भव्य ध्वज उभारुन तसेच भगव्या रंगाची सुंदर अशी झालर लावून परिसर सुशोभित केला.

परभणी : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात राजकीय पक्ष, संघटना, संस्था, मंडळे व हजारो नागरिकांच्यावतीने शुक्रवारी (ता.19) विविध उपक्रमाद्वारे अभिवादन करण्यात आले.

येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळा परिसरात गेल्या चार दिवसांपासून काही संघटनांनी भव्य ध्वज उभारुन तसेच भगव्या रंगाची सुंदर अशी झालर लावून परिसर सुशोभित केला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चबुतर्‍यावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई तसेच रंगीबेरंगी फोकसद्वारे प्रकाशझोत टाकला होता. त्यामुळे संपूर्ण परिसर या रंगी-बेरंगी रंगांनी उजळून निघाला होता. मध्यरात्री 12 वाजता चबुतर्‍यासह पुतळ्याचा परिसर रंगी-बेरंगी फुलांनी सजविण्यात आला होता. वारकरी मंडळाद्वारे उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब मोहिते पाटील व अन्य पदाधिकार्‍यांनी, भजनी मंडळे, महिला भजनी मंडळे आदींनी टाळ, मृदंगाच्या गजरात हरिनामाचा जप करीत दिव्य सोहळा आयोजित केला. तसेच विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या व्यक्तींचा सुध्दा मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करीत गौरव करण्यात आला. 

सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत विविध पक्ष, संस्था, संघटना तसेच मंडळे व नागरीकांनी या पुतळा परिसरात दाखल होवून शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. तसेच विविध उपक्रमांचा शुभारंभही केला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाद्वारे सार्वजनिक कार्यक्रमांवर मोठ्या प्रमाणात निर्बंध लादल्याने पदाधिकार्‍यांसह कार्यकर्ते व शिवभक्त चांगलेच हिरमुसले होते. परंतु, अतिशय शिस्तबध्द पध्दतीने शिवभक्तांनी शिवजयंतीचा आनंद द्विगुणित केला. ‘जय भवानी, जय शिवराय’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या घोषणांनी संपूर्ण पुतळा परिसर अक्षरशः दणाणला होता.

महापौर व जिल्हाधिकाऱ्यांनी केले अभिवादन 

शुक्रवारी (ता.19) सकाळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांनी महसूल प्रशासनाच्यावतीने शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. महापौर अनिता सोनकांबळे, उपमहापौर भगवान वाघमारे, महापालिका आयुक्त देविदास पवार यांच्यासह अन्य पदाधिकारी व सदस्यांनीही अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक उत्सव समिती, अखिल भारतीय वारकरी महामंडळ संलग्न शिवजयंती महोत्सव समिती तसेच मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, छावा, संभाजी सेना, जिजाऊ ब्रिगेड आदी संघटनांच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनीही शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

आरएसएसच्यावतीने मानवंदना

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने सकाळी पुतळा परिसरात सघोष मानवंदना दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर संघचालक डॉ. रामेश्‍वर नाईक, कार्यवाह सुरेश देशमुख, राजन मानकेश्‍वर, घोषप्रमुख मयुर काकडे यांच्यासह अन्य स्वयंसेवक याप्रसंगी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shri Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti was celebrated in Parbhani