औरंगाबाद - ज्येष्ठ नागरिक, तरुण, बच्चेकंपनीने शहरातील वर्दळीतून बाहेर पडत सुटीचा दिवस एन्जॉय करायचा म्हटले तर जायचे कुठे? या प्रश्नाचे उत्तर सध्या कोणाकडेच नाही. कारण शहरात असलेल्या 114 उद्यानांची बकाल अवस्था झाली आहे. एकमेव स्थळ असलेल्या सिद्धार्थ उद्यानालादेखील बीओटीसह इतर इमारतींचा विळखा पडला असून, उद्यान नावालाच उरले आहे. जागेअभावी येथील खेळण्या, संगीत कारंजे गायब झाले आहेत. त्यात आता प्राणिसंग्रहालयाची परवानगीदेखील धोक्यात आली आहे.
महापालिकेचे सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालय संपूर्ण मराठवाड्यातील जनतेसाठी आकर्षण ठरलेले आहे. शेकडो सहलींसह शहरातील नागरिक व लाखो पर्यटक दरवर्षी उद्यान, प्राणिसंग्रहालयाला भेट देतात. मात्र, उद्यानासह प्राणिसंग्रहालयाचा सध्या श्वास गुदमरला आहे. सुरवातीला सिद्धार्थ उद्यान 32 एकरांत होते. औरंगाबादचे शिल्पकार म्हणून ओळख असलेल्या रफिक झकेरिया यांनी पुढाकार घेत हे उद्यान सुरू केले. त्यानंतर काही काळातच शहराच्या आकर्षणाचे ते केंद्र बनले. दरम्यान, सुमारे 14 एकर जागा प्राणिसंग्रहालयासाठी देण्यात आली व उद्यानाचा पहिला तुकडा पडला. त्यानंतर वर्षानुवर्षे सिद्धार्थ उद्यानाची जागा इतर उपक्रमांसाठी वापरून लचके तोडण्याचे प्रशासनाचे प्रकार सुरूच आहेत.
हे ही वाचा : या आमदाराने दिले कार्यकर्त्याला चपलाचा जोड
उद्यानाच्या जागेतच वाहतूक उद्यान, मराठवाडा मुक्तिसंग्राम संग्रहालय व स्तंभ उभारण्यात आला. त्यानंतर बीओटी प्रकल्पासाठी उद्यानाची रस्त्यालगत असलेली जागा देण्यात आली. त्यामुळे उद्यानाची रयाच हरवली आहे. विविध आकर्षक खेळण्या, मिनीट्रेनमुळे कधीकाळी सिद्धार्थ उद्यान लहान मुलांच्या गर्दीने फुलून जायचे. मात्र आता सिद्धार्थ उद्यान डबापार्टीचे स्थान झाले आहे.
प्राणिसंग्रहालयही संकटात
1985 मध्ये सुरू झालेल्या प्राणिसंग्रहालयात सध्या विविध प्रकारचे 310 प्राणी आहेत. मात्र, अपुरी जागा आणि प्राण्यांसाठीच्या सुविधांकडील दुर्लक्ष यामुळे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने 22 मे 2015 ला महापालिकेला नोटीस बजावली होती. त्याचवेळी महापालिकेने प्राणिसंग्रहालयातील सुधारणांबाबतचा सुमारे 30 कोटी रुपये खर्चाचा मास्टर प्लॅन तयार करून तो प्राधिकरणाकडे सादर केला. मात्र, त्याची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही.
ठळक बातमी : समुहशेती राबवणारे धनगरवाडी ठरतेय आदर्श गाव
प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने पुन्हा एकदा महानगरपालिकेला नोटीस पाठवून निर्वाणीचा इशारा दिला होता. त्यात त्यांनी पिंजऱ्यांची दुरुस्ती करणे, मिनीट्रेन बंद करणे यासह 25 सूचना केल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने ट्रेन बंद केली; परंतु उर्वरित सूचनांबाबत उपाययोजना झाल्या नाहीत. त्यामुळे 28 ऑक्टोबर 2018 ला प्राणिसंग्रहालयाचा परवाना रद्द करण्याचे आदेश काढले. महापालिकेच्या अपिलानंतर एका वर्षासाठी परवानगी देण्यात आली, मात्र त्यानंतरही अत्यावश्यक कामे करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे पुन्हा कारवाई होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
आकडे बोलतात...
प्राणिसंग्रहालयाची स्थापना- 1985
प्राण्यांची संख्या - 310
वर्षाकाठी भेट देणारे पर्यटक - 2 लाख
सुधारणांसाठीचा अपेक्षित खर्च - 30 कोटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.