देवालय बनले सेवालय, परराज्यातील मजुरांबरोबरच बेघर लोकांना निवारा

सुशांत सांगवे
बुधवार, 1 एप्रिल 2020

भीक मागून आपले आणि कुटूंबाचे पोट भरणारे लोक बऱ्याचदा मंदिराबाहेर पाहायला मिळतात. अशा बेघर लोकांबरोबरच परराज्यातील मजुरांसाठी संचारबंदीच्या काळात मंदिर हेच सेवालय बनले आहे. या सेवालयात बेघर आणि मजूरांची चहा, दोन्ही वेळेचे जेवण आणि निवासाची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांना चांगलाच आधार मिळाला आहे.
‘कोरोना’चा फैलाव टाळण्यासाठी गर्दी टाळा, असे आवाहन सरकारने केले आहे.

लातूर  : भीक मागून आपले आणि कुटूंबाचे पोट भरणारे लोक बऱ्याचदा मंदिराबाहेर पाहायला मिळतात. अशा बेघर लोकांबरोबरच परराज्यातील मजुरांसाठी संचारबंदीच्या काळात मंदिर हेच सेवालय बनले आहे. या सेवालयात बेघर आणि मजूरांची चहा, दोन्ही वेळेचे जेवण आणि निवासाची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांना चांगलाच आधार मिळाला आहे.
‘कोरोना’चा फैलाव टाळण्यासाठी गर्दी टाळा, असे आवाहन सरकारने केले आहे. त्यामुळेच शहरातील जीवनावश्यक दुकाने वगळता अन्य दुकाने, मॉल, हॉटेल बंद केले आहेत. इतकेच काय मंदिरेसुद्धा बंद करण्यात आली आहेत.

त्यामुळे रस्त्यावरच जगणाऱ्या बेघर लोकांनी आपले पोट कसे भरायचे, हा प्रश्न निर्माण झाला. टाळेबंदी दरम्यान काही सामाजिक संस्था पुढे आल्या. त्यांनी पोलिसांच्या मदतीने मंदिरे, बसस्थानक, हॉटेल, गंजगोलाई या भागात भीक मागून पोट भरणाऱ्या बेघर लोकांना जेवणाचे वाटप केले. पण, लगेचच संचारबंदी लागू झाल्याने बेघर लोकांबरोबरच मजूरांच्याही पोटाचा प्रश्न निर्माण झाला.

वाचा ः  कामगारांचा पंधराशे किलोमीटर पायी प्रवास, भाकरीचा प्रश्‍न न सुटल्याने चालले गावी

संचारबंदी लागू झाली असल्याने बेघर लोकांनी रस्त्यावर वावरणे चुकीचे आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि महापालिकेने पुढाकार घेऊन अशा व्यक्तींची सोय सिद्धेश्वर मंदिरात व्हावी, असे सूचविले. मंदिरातील प्रशासनाने लगोलग ही सूचना मान्य करून बेघर लोकांची मंदिरात सोय करण्यास सुरवात केली. आतापर्यंत २६ बेघर लोकांची येथे सोय झाली आहे. याबरोबरच सिद्धेश्वर मंदिराच्या आवारात महाशिवरात्री यात्रेसाठी आलेल्या ३५ कामगारांचीही येथे राहण्याची सोय करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मुंबई या भागातील हे कामगार आहेत. गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून ते लातूरातच आहेत. संचारबंदीमुळे त्यांना आपल्या गावी परत जाता आले नाही.

हेही वाचा ः लातूर जिल्हाधिकाऱ्यांचा एप्रिल फुल, मॉर्निंग वॉक करणारे सहा जण ताब्यात

घरोघरातून दोन पोळ्या
बेघर लोकांची आणि मजूरांची राहण्या-जेवणाची सोय मंदिर प्रशासनाने केली आहे. येथेही प्रत्येकात तीन ते पाच फुटांचे अंतर ठेवण्याच्या, चेहऱ्याला रुमाल बांधण्याच्या सूचना दिल्या जातात. आमच्याबरोबरच पोलिसांचेही या सर्वांवर लक्ष आहे. विशेष म्हणजे, सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे, असे सांगून मंदिराचे व्यवस्थापक दत्ता सुरवसे म्हणाले, बेघर लोकांच्या आणि मजूरांच्या दोन वेळच्या जेवणासाठी काही सामाजिक संस्था पुढे येत आहेत. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनीही यासाठी मदत दिली. राम गल्लीतील रहिवाशांनी बुधवारी (ता.एक) घरोघरी दोन पोळ्या बनवण्यासाठी पुढाकार घेतला. अशा पद्धतीने २०० हुन अधिक पोळ्या आणि भाजी तयार करून बेघर आणि मजूरांना देण्यात आली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Siddheshwar Temple Provide Shelter, Food To Needy People Latur