लॉकडाऊन : नांदेडमध्ये नऊ वऱ्हाडींच्या उपस्थितीत उरकला विवाह

प्रमोद चौधरी
Friday, 17 April 2020

नांदेडमध्ये गुरुवारी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत, तसेच कुठलाही बडेजाव न करता विवाह सोहळा साध्यापद्धतीने पार पडला. विशेष म्हणजे केवळ नवरदेवाकडील तीन व नवरीकडील सहा इतक्याच वऱ्हाडींची उपस्थिती होती. 

नांदेड : आयुष्यातील महत्त्वाचा क्षण म्हणजे लग्न. त्यामुळे लग्न थाटामाटात झाले पाहिजे अशी प्रथा समाजात रुढ झाली. मात्र, ‘कोरोना’ संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सूचना शासनस्तरावरून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ठरलेला विवाहसोहळा फक्त नऊ वऱ्हाडींच्या उपस्थितीत नांदेडमध्ये झाला. 

आयुष्यातील महत्त्वाचा क्षण म्हणजे लग्न. त्यामुळे या लग्नसोहळ्याच्या आनंदामध्ये वधु-वरांसह घरातील सर्व कुटुंब, नातेवाईक आणि आप्तेष्टांचाही सहभागी होत असतात. प्रत्येकजण विविध कामांची वाटणी करतात. मात्र, यावर्षी कोरोनाने या उत्साहावर निर्बंध आणल्यामुळे अनेकांनी साध्यापद्धतीने म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून विवाह उरकवत आहेत. तर काही हौशींनी लॉकडाऊनच्या काळातील तारखा या पुढे ढकलल्या आहेत.  परिणामी, ऐन हंगामामध्ये मंगल कार्यालये ओस पडली असून बॅण्डपथकही घरीच बसून आहे. 

हेही वाचा - लॉकडाऊन : चक्क नवरीलाच नवरदेवाने आणले दुचाकीवरून घरी

पत्रिकांचे वाटपच झाले नाही 
महाराणा प्रताप चौक परिसरातील गोविंदनगर येथे हा सोहळा गुरुवारी (ता.१६ एप्रिल २०२०) पहाटे सहा वाजता पार पडला. वधू अश्‍विनी अर्जून काळे आणि वर चांदू शिवाजीराव डोणे (खैरगाव, ता. अर्धापूर) यांचा विवाह पूर्वीच १६ एप्रिलला ठरवण्यात आला होता. त्यासाठी निमंत्रण पत्रिकाही छापण्यात आल्या. दरम्यानच्या काळात ‘कोरोना’चा संसर्ग टाळण्यासाठी देशच लॉकडाऊन करण्यात आला. तसेच गर्दी टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे आवाहन शासन, जिल्हा प्रशासनाच्या वतीने केले होते. त्यामुळे काळे आणि डोणे कुटुंबियांना या विवाह सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकांचे वाटपच करता आले नाही. 

पारंपरिक पद्धतीने झाला सोहळा
गोविंदनगर येथे धामधुममध्ये अश्‍विनीचा विवाह तिचे काका रामू बबनराव काळे लावून देणार होते. त्याची तयारीही जय्यत सुरु होती. परंतु, कोरोनामुळे त्यांना अगदी साध्या पद्धतीने म्हणजे नऊ वऱ्हाडींच्या उपस्थितीमध्ये घरामध्ये हा विवाह सोहळा करावा लागला. विशेष म्हणजे, रामू काळे आॅटो चालवून काठीण्य पातळीवर उदरनिर्वाह करत आहेत. अशाही परिस्थितीमध्ये पुतणीच्या लग्नाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांचा प्रयत्न होता. सोशल डिस्टन्सचे पालन करून त्यांनी गुरुवारी अश्‍विनी आणि चांदू यांचा विवाह हा लावून दिला. या विवाह सोहळ्याला वराकडील दोन (करवली आणि वडील) आणि वधुकडील सात एवढ्याच वऱ्हाडींची उपस्थिती होती. घरामध्येच हा सोहळा कुठलाही बडेजाव न करता पारंपरिक पद्धतीने पार पडला. 

हे देखील वाचाच - Video : विधायक : शहर वाहतूक शाखेने दिला गरजूंना मदतीचा हात

काळे कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती बिकट
गोविंदनगरात अर्जून बबनराव काळे यांचे घर आहे. दोन वर्षांपूर्वी अर्जून काळे यांचे निधन झाले. त्यांना अश्‍विनी आणि अजय अशी दोन मुले आहेत. दिवंगत अर्जून यांची पत्नी दिव्यांग आहे. धुणी-भांडीची कामे करून त्या कसाबसा कुटुंबाचा गाडा चालवतात. आपल्या आईला मदत व्हावी म्हणून मुलगा अजयही दररोज सकाळी घरोघरी वर्तमानपत्र पोचवण्याचे काम करत आहे.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Simple Wedding Ceremony in Nanded City