
पालम तालुक्यातून बिनविरोध ग्रामपंचायतीचे मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सिरपूर गावाने ग्रामपंचायत बिनविरोध काढत इतिहास रचला. ते ज्येष्ठांच्या मार्गदर्शन आणि पाच जणांनी उमेदवारीच बलिदान दिल्यामुळे होऊ शकल.
पालम ः तालुक्यातून बिनविरोध ग्रामपंचायतीचे मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सिरपूर गावाने ग्रामपंचायत बिनविरोध काढत इतिहास रचला. ते ज्येष्ठांच्या मार्गदर्शन आणि पाच जणांनी उमेदवारीच बलिदान दिल्यामुळे होऊ शकल.
पालम तालुक्यात सुशिक्षितांचा गाव म्हणून सिरपूरची ओळख. त्याला साजेशी कामगिरी ग्रामस्थांना करता आली नव्हती. ही खंत मनात ठेवून प्रत्येक जण विकासाची आस लावून होता. म्हणून गावातील ज्येष्ठ मंडळी सर्व हेवेदावे, मतभेद, मनभेद विसरून एकत्र आली. त्यांनी नामनिर्देशन पत्र भरण्याच्या तीन दिवसांपूर्वी गावात बिनविरोध ग्रामपंचायत काढली. त्या शब्दाला जागत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडत अखेर सिरपूर ग्रामपंचायत बिनविरोध निघाली. त्यासाठी प्रा.सुधाकर शेवटे, गोपीनाथ देशमुख, धनंजय गायकवाड, धोंडीबा कुरे, महेश लांडे यांनी उमेदवारीचं बलिदान देत गावाची इज्जत राखली. म्हणून गावात निवडणुका घेण्याची गरज राहिली नाही. बिनविरोध सदस्यांत राहुल आवरगंड, पत्रकार भास्कर लांडे, सदाशिव लांडे, सुधाकर हनवते, बालाजी दुधाटे, विठ्ठल कदम, कृष्णा बचाटे यांचा समावेश आहे. ग्रामपंचायत बिनविरोध काढण्यासाठी जयवंतराव लांडे, प्रा. सुधाकर शेवटे, शिक्षक भाऊसाहेब आवरगंड, बाबाराव आवरगंड, भाऊराव लांडे, सुभाष आवरगंड, अजय देशमुख, तुकाराम महाराज लांडे, बाळू महाराज लांडे, रामराव दुधाटे, माधव कांबळे, दत्तराव आवरगंड, बालासाहेब बिडकर, मारुती आवरगंड, माणिकराव लांडे, बालाजी लांडे, रामचंद्र दुधाटे, नागनाथ कदम, माणिक कदम यांच्यासह ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.
पाथरी तालुक्यातील चार ग्रामपंचायती बिनविरोध
पाथरी ः काही ठिकाणी मर्यादित उमेदवारी अर्ज आल्याने तर काही ग्रामपंचायतीतुन उमेदवारी अर्ज वापस घेतल्याने तालुक्यातील खेर्डा, नाथरा, बोरगव्हान व वरखेड या चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तालुक्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध होण्यासाठी आमदार बाबाजानी दुराणी यांनी महाविकास आघाडीच्या गावपातळीवर सर्वच पक्षाच्या गावपुढाऱ्यांशी चर्चा करून ज्या गावात बिनविरोध निवड होऊ शकते त्या गावात प्रयत्न केले होते. त्याला तालुक्यात पाच ठिकाणी यश आले. खेर्डा ग्रामपंचायतीच्या नऊ जागेसाठी नऊच उमेदवारी अर्ज आल्याने त्या गावची केवळ घोषणाच बाकी होती. दरम्यान आज (ता.चार) रोजी उमेदवारी अर्ज वापस घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाथरा, बोरगव्हान, वरखेड येथील उमेदवारी अर्ज परत निघाल्याने या ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या आहेत. तालुक्यातील ४२ पैकी चार ग्रामपंचायत बिनविरोध निघाल्याने आता ३८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.
हेही वाचा - आपली ही शेवटची लढाई असून आपण ही जिंकणारच या आशेने त्यांनी उमेदवारी अर्ज भरुन प्रचाराला लागले आहेत
परभणी तालुक्यातून ४३७ उमेदवारांची माघार
परभणी : परभणी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतुन उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीत सोमवारी (ता.चार) ४३७ उमेदवारांनी रिंगणातून माघार घेतली आहे. तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यासाठी दोन हजार पाच उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननी प्रक्रियेतून दोन हजार पाच अर्ज वैध ठरले होते. त्यामुळे उमेदवारी अर्ज माघारीच्या प्रक्रियेवर संपूर्ण लक्ष केंद्रित झाले होते. पॅनलप्रमुख व स्थानिक पुढार्यांनी उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीत अंतिम क्षणापर्यंत जोरदार खलबते, गुप्त बैठका, आमिषे वगैरे दाखवून प्रतिस्पर्ध्यांना रिंगणातून बाहेर पडण्याकरिता येनकेन प्रकारे प्रयत्न केले. परंतु त्यास तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. एकूण ४३७ उमेदवारांनी माघार घेतली खरी. परंतू, ८८ ग्रामपंचायतीत आता एक हजार ५४६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर व तहसीलदार संजय बिरादार यांनी दिली.
संपादन ः राजन मंगरुळकर