शॉर्टसर्किटमुळे सहा एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्यांचे दहा लाखांचे नुकसान, मंठा शहराजवळील घटना

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 November 2020

मंठा येथील शेतकरी रामकिसन जिजाभाऊ बोराडे आणि बालासाहेब जिजाभाऊ बोराडे यांच्या शेतातील सहा एकर उसाला रविवारी ( ता. २९ ) शॉर्टसर्किटमुळे आग लागली.

मंठा (जि.जालना) : मंठा येथील शेतकरी रामकिसन जिजाभाऊ बोराडे आणि बालासाहेब जिजाभाऊ बोराडे यांच्या शेतातील सहा एकर उसाला रविवारी ( ता. २९ ) शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ऊस जळून खाक झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अंदाजे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे तहसीलदार सुमन मोरे यांनी सांगितले आहे.

शहरातील हॉटेल दर्शनाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या रामकिसन बोराडे आणि बालासाहेब बोराडे यांच्या शेतात सहा एकरावर उसाचे पीक आहे. शेतात
सकाळी दहा वाजता उसाच्या पिकाला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्यानंतर येथील नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाचा बंब आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या विहिरीवरील वीजपंप सुरु करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. दुपारी बारा वाजेनंतर कसेबसे आगीवर नियंत्रण मिळविता आहे.

मात्र या आगीत शेतकऱ्यांचे अंदाजे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान, घटनास्थळी शिवसेना जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे, तहसीलदार सुमन मोरे, संतोष वरकड, बाजार समितीचे संचालक प्रल्हादराव बोराडे, नगराध्यक्ष नितीन राठोड, शिवसेना तालुका प्रमुख अजय अवचार यांनी भेट दिली. तलाठी सय्यद युनूस यांनी आगीत जळालेल्या ऊस पिकाचा पंचनामा केला. यावेळी वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता संदीप जयस्वाल आणि कर्मचारी उपस्थित होते.
 

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six Acre Sugarcane Burned In Shortcircut Near Mantha Jalna News