Breaking : नरभक्षक बिबट्याचा आष्टीत तिसरा बळी, सकाळी एका महिलेवर हल्ला, तर सायंकाळी एका महिलेचा घेतला जीव

bibtya.jpg
bibtya.jpg

आष्टी (बीड) : आष्टी तालुक्यातील पारगाव जोगेश्वरी येथे सकाळी एका महिलेवर बिबट्याने जीवघेणा हल्ला केल्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास बिबट्याने एका महिलेचा बळी घेतला आहे. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे नरभक्षक बिबट्याचा आष्टी तालुक्यातील हा तिसरा बळी ठरला आहे. सुरेखा नीळकंठ बळे (वय 45) असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. सकाळी महिलेवर जीवघेणा हल्ला व सायंकाळी गेलेला बळी यामुळे आष्टी तालुका सुन्न झाला आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
मिळालेल्या माहितीनुसार सुरेखा बळे या पारगाव जोगेश्वरी येथील शेतवस्तीवर कुटुंबासह राहतात. रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्या घराच्या पाठीमागे शौचासाठी गेल्या होत्या. यावेळी बिबट्याने त्यांना मानेला धरून उचलून नेत ज्वारीच्या शेतात नेले. बराच वेळ होऊनही त्या परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता ज्वारीच्या शेतात छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. या घटनेने खळबळ उडाली आहे. सकाळी शालनबाई शहादेव भोसले (वय 60, रा. बोराडेवस्ती, पारगाव जोगेश्वरी) या महिलेवर साडेअकराच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. त्यात मानेला गंभीर जखमा झाल्याने त्यांना नगरला हलविण्यात आलेले आहे.

छिन्नविछिन्न मृतदेह
यापूर्वी झालेल्या दोन घटनांत बिबट्याने मानेवर हल्ला करून नरडीचा घोट घेतल्याचे दिसून आले होते. सुरेखा बळे यांच्या शरीराचे मात्र बिबट्याने लचके तोडून मृतदेह छिन्नविछिन्न केल्याचे आढळून आले. विशेष बाब म्हणजे सकाळी झालेल्या हल्ल्याची माहिती घेऊन वन विभागाचे पथक पारगावजवळील देवीगव्हाण शिवारात गेले असताना मागे हा हल्ला होऊन महिलेचा बळी गेला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. आमदार सुरेश धस यांनीही घटनास्थळी तळ ठोकून आहेत.

अनेक गावांत बिबट्याचे दर्शन

सुरुडी व किन्हीतील बळीनंतर बिबट्याने पारगाव जोगेश्वरीमध्ये आज तिसरा बळी घेतला. तसेच मंगरूळमध्ये शनिवारी माय-लेकावर हल्ला केला. पारगाव हे ठिकाण आष्टीपासून बारा किलोमीटर दक्षिणेकडे आहे. सुरुडीजवळील पांगरा, तसेच बीडसांगवी, कासेवाडी, पांगुळगव्हाण, आष्टा, शेरी यासह आष्टी परिसरातील अनेक गावांत आज बिबट्याने दर्शन दिल्याचे सांगण्यात येत आहे.

सुरुडीत शेतकर्‍यावर पुन्हा हल्ला
नरभक्षक बिबट्याने पहिला बळी घेतलेल्या तालुक्यातील सुरुडी गावात आज बिबट्याने पुन्हा एका शेतकर्‍यावर हल्ला केला. सुदैवाने यावेळी आजूबाजूला शेतकरी असल्याने बिबट्याने धूम ठोकली. आज सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात विश्वनाथ सारूक (वय 48) किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्या प्राणावरचे संकट टळले. सारूक हे शेतात जनावरे चारत होते. यावेळी झुडूपातून येऊन बिबट्याने अचानक सारूक यांच्यावर झेप घेतली. परंतु सावध असलेल्या सारूक यांनी मोठ्या शिताफीने ही झडप चुकविली.आजूबाजूला शेतकरी असल्याने यावेळी मोठा आरडाओरडा झाला. त्यामुळे बिबट्याने धूम ठोकली. या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. यापूर्वी मंगळवारी (ता. 24) बिबट्याने मोराळा पंचायत समिती गणाच्या सदस्या आशा गर्जे यांचे पती नागनाथ गर्जे यांचा बळी घेतला होता. शेतात तुरीला पाणी देत असताना दुपारच्या वेळी बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला होता. पारगावमध्ये एकाच दिवसात दोन हल्ले करून बिबट्याने एका महिलेचा सायंकाळी बळी घेतला. सुरुडीतील हल्ल्यालाही आठवडा उलटत नाही तोच बिबट्याने पुन्हा हल्ला केल्याने परिसरात चिंता व्यक्त होत आहे.

(संपादन-प्रताप अवचार)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com