
सहा ग्रामसेवकांना केले निलंबित
जालना - कामचुकारपणा करणाऱ्या सहा ग्रामसेवकांना मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. कामात सुधारणा करण्याच्या सूचना देऊन ही कामचुकारपणा कायम ठेवल्याने मंगळवारी (ता.१९) ही कारवाई करण्यात आली आहे.
जालना पंचायत समितीअंतर्गत दहा ग्रामसेवक यांनी कामात सतत अनियमितता आणि शासकीय कामकाजात टाळाटाळ केली होती. वारंवार सूचना देऊन देखील काम करीत नसल्याने, लोकअदालतीस अनुपस्थित राहणे, याद्या सादर न करणे, वार्षिक प्रशासन अहवाल सादर न करणे, २०२२-२३ या वर्षाचे अंदाजपत्रक सादर न करणे, घरकुल लाभार्थी सर्वेक्षण न करणे, मासिक प्रगती अहवाल सादर न करणे, पाणंद रस्त्याचे प्रस्ताव सादर न करणे आदी कारणामुळे या ग्रामसेवकांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यासंदर्भात जालना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता.
त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल यांनी ता.२७ मे रोजी कारणे दाखवा नोटीस देऊन तीन दिवसांमध्ये प्रलंबित कामे पूर्ण करून खुलासा सादर करणे बाबत सुचीत केले होते. त्यापैकी निलंबित सहा ग्रामसेवकांच्या कामात सुधारणा केली नाही. त्यामुळे बाजीउब्रद व टाकरवण येथील ग्रामसेवक एन.एस. शेळके, सेवली व पिंपळवाडी येथील एस. जे. गवई, खोडेपुरीतील एस. पी. खिल्लारे, राममूर्ती येथील आर. एस. जाधव, मोहाडी येथील व्ही. एस. गोरे, ममदाबाद येथील एम. एम. जाधव यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. या निलंबनाच्या काळात या सहा ग्रामसेवकांना घनसावंगी पंचायत समिती मुख्यालय देण्यात आले असून मुख्यालयात रोज हजर राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.
Web Title: Six Gram Sevak Were Suspended In Jalna District
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..