esakal | जैन मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरल्या सहा मूर्त्या, पोलिसांकडून शोध सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

Jain Statues

बीड जिल्ह्यातील आष्टीत पेठगल्ली भागात असलेल्या चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिरातील सहा मूर्त्यांची चोरी झाल्याची घटना बुधवारी (ता.१९) सकाळी उघडकीस आली आहे. याबाबत आष्टी पोलिस ठाण्यात सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीने पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे.

जैन मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरल्या सहा मूर्त्या, पोलिसांकडून शोध सुरु

sakal_logo
By
अनिरुद्ध धर्माधिकारी

आष्टी : शहरातील पेठगल्ली भागात असलेल्या चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिरातील सहा मूर्त्यांची चोरी झाल्याची घटना बुधवारी (ता.१९) सकाळी उघडकीस आली आहे. याबाबत आष्टी पोलिस ठाण्यात सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीने पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे.

वाचा : निजामकालीन मानाची परंपरा यंदा खंडीत, बैलपोळा साध्या पद्धतीने साजरा

याबाबत अधिक माहिती अशी, की शहरातील पेठगल्ली परिसरात जैन समाजाचे श्री चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर असून महावीर स्वामी, २४ तीर्थंकर पार्श्वनाथ भगवंतासह इतर मूर्त्या आहेत. मंगळवारी (ता.१८) रात्री उशिरा अज्ञात चोरट्यांनी प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून मंदिरातील सहा मूर्ती लांबविल्या. मंदिराचे पुजारी धर्मेंद्र उपाध्ये (पंडित) हे बुधवारी (ता. १९) सकाळी साडेसहा वाजता साफसफाईसाठी मंदिरात आले असता त्यांना मुख्य दरवाजाचे कुलूप दिसून आले नाही. मुख्य दरवाजा ढकलून आत आल्यावर समोरच्या मुख्य पितळी मूर्ती, मानस्तंभ, स्फटिकाची मूर्ती अशा एकूण सहा मूर्ती चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

हेही वाचा : लातूर पालिकेकडे अँटिजेन टेस्ट किटचा तुटवडा; व्यापारी, हमालांची तपासणी लांबली

दरम्यान, सकल दिगंबर जैन समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या मंदिरात मुख्य मूर्त्यांची चोरी झाल्याने आष्टी शहरात खळबळ उडाली असून भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा लवकरात-लवकर तपास लावण्याची मागणी सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीने बुधवारी पोलिस निरीक्षकांकडे निवेदन देऊन करण्यात आली. निवेदनावर सुभाष बोंदार्डे, रवीकिरण गंगसेठी, सुनील पंढरे, सुरेश झरेकर, राजकुमार जानापुरे, संजीव वर्धमाने, नीलेश होनकसे, मनोज वर्धमाने, अजित पंढरे, सचिन बोंदार्डे, रमेश झरेकर, उमेश पंढरे, धर्मेंद्र उपाध्ये (पंडित) यांच्या सह्या आहेत.

मंदिरातून चोरी गेलेल्या मूर्त्यांचा तपशील असा
१. श्री चोवीस तीर्थंकरांची पितळी मूर्ती- एक, २. मानस्तंभाची नंदेश्वराची पितळी मूर्ती- एक, ३.महावीर स्वामींची स्फटिकाची मूर्ती-एक, ४. पार्श्वनाथ भगवंतांची पितळी मूर्ती-एक, ५. पद्मावतीच्या पितळी मूर्ती-दोन