आष्टी शहराजवळ बिबट्याचा संचार? नागरिक म्हणतात बिबट्या पाहिला तर वन अधिकारी म्हणतात तरस असावा

अनिरुद्ध धर्माधिकारी
Friday, 27 November 2020

शहराला लागून असलेल्या वारंगुळे वस्तीवर गुरुवारी सकाळी 10 वाजता विठ्ठलराव बनसोडे यांच्या शेतात दोन बिबट्यांच्या पायाचे ठसे आढळून आले. यानंतर सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पारधी वस्तीवरील शेतकऱ्यांनी बिबट्या पाहिल्याचे सांगितले. अनेक शेतकऱ्यांनी हा बिबट्या डोळ्यांनी पाहिला.

आष्टी (बीड) : आष्टी तालुक्यातील सुरडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी आष्टी शहराजवळ काही शेतकऱ्यांना बिबट्या दिसल्याची चर्चा होत आहे. पाहिलेला प्राणी बिबट्याच होता, असे शेतकरी ठामपणे सांगत आहेत. तर दुसरीकडे वन अधिकाऱ्यांनी भेट देऊन हा प्राणी तरस असावा असा अंदाज व्यक्त केला आहे.

शहराला लागून असलेल्या वारंगुळे वस्तीवर गुरुवारी सकाळी 10 वाजता विठ्ठलराव बनसोडे यांच्या शेतात दोन बिबट्यांच्या पायाचे ठसे आढळून आले. यानंतर सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पारधी वस्तीवरील शेतकऱ्यांनी बिबट्या पाहिल्याचे सांगितले. अनेक शेतकऱ्यांनी हा बिबट्या डोळ्यांनी पाहिला. याची समाजमाध्यमांवरही माहिती पसरली. त्यानंतर वन विभागाचे युनुस शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. ठसे व इतर माहिती घेऊन वन विभागाने हा प्राणी बिबट्या नसून तरस असल्याचे सांगितले. परंतु प्रत्यक्षदर्शी मात्र पाहिलेला प्राणी बिबट्याच होता, असा ठाम दावा करीत आहेत. शहरानजीकच्या शेतवस्तीत बिबट्या आल्याच्या चर्चेने शहर परिसरात घबराट पसरली आहे. सध्या लवकर अंधार पसरत असल्याने विशेषतः दुचाकीवर घरी जाणाऱ्यांमध्ये  यामुळे प्रचंड भीती आहे.

हे ही वाचा : चार लेकींना डॉक्टर करण्याची जिद्द; फी भरण्यासाठी कुटूंबियांची सुरुय धडपड

आष्टी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या संचाराने दहशत निर्माण झाली आहे. तालुक्याच्या हद्दीला लागून असलेल्या पाथर्डी (जि. नगर) तालुक्यातील गावांमध्ये नरभक्षक बिबट्याने तीन बालकांना ठार केले. त्यानंतर हा बिबट्या आष्टी तालुक्यात आल्याची चर्चा झाली. अनेकांना बिबट्याचे वारंवार दर्शनही होत असल्याचे पुढे आले. याच चर्चेच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सावरगाव (मायंबा) परिसरात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यावर एक मादी बिबट्या जेरबंद झाला. त्यामुळे आष्टी तालुक्यातील हद्दीवरील गावांमध्ये बिबट्याचा वावर असल्यावर शिक्कामोर्तब झाले.

दरम्यान, सावरगावनंतर पाथर्डी तालुक्यातील, परंतु आष्टी तालुक्याला लागून असलेल्या भागात दोन बिबटे जेरबंद झाले. त्यानंतर मंगळवारी तालुक्यातील सुरडी येथे बिबट्याने भरदिवसा एका शेतकऱ्याच्या नरडीचा घोट घेतला. या हल्ल्यात मोराळा पंचायत समिती गणाच्या सदस्या आशा गर्जे यांचे पती नागनाथ गर्जे यांचा मृत्यू झाला. युवा नेत्याच्या मृत्यूने तालुक्यात हळहळ व्यक्त होत असतानाच नरभक्षक बिबट्याची दहशतही या भागावर पसरली आहे. काल वन विभागाने या भागात पिंजरा लावला आहे. परंतु, अद्याप बिबट्या जेरबंद झालेला नाही. त्यामुळे परिसरात दहशत कायम आहे.

चर्चा असो वा नसो, बिबट्याची दहशत आहेच...

पाथर्डीला लागून असलेला व नरभक्षक बिबट्या आल्याची चर्चा झालेला भाग हा सुरडीपासून सुमारे 30 किलोमीटर दूर आहे. सुरडी परिसरात यापूर्वी बिबट्या आल्याची साधी चर्चाही झालेली नव्हती. परंतु, शेजारील पाटसरा गावात काहींना बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यानंतर मंगळवारी तुरीला पाणी देणाऱ्या शेतकऱ्याला भरदिवसा बिबट्याने ठार केले. त्यामुळे बिबट्या आल्याची चर्चा असो वा नसो, डोंगरपट्ट्यातील सर्वच गावांमध्ये दहशत आहे. त्यात आता आष्टी शहराजवळही बिबट्या दिसल्याची चर्चा होत असल्याने वन विभागाने बिबट्याबाबत ठोस उपाययोजना करून नागरिकांना दिलासा देणे गरजेचे बनले आहे.

सकाळी वस्तीवर शेतात होतो. यावेळी शेजारीच असलेल्या पारधी वस्तीवर आरडाओरडा झाल्याचा आवाज आला. चौकशी केल्यानंतर तेथील काही लोकांना बिबट्या दिसल्याचे कळाले. माझ्या शेतातही काही पाऊलखुणा आढळल्याने मी वनविभागाच्या अधिका-यांना कळविले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी माझ्या शेतातील ठशांची पाहणी करून बिबट्यासदृश्य प्राण्याचेच ठसे असल्याचे मला सांगितले. 
- विठ्ठलराव बनसोडे, शेतकरी

आष्टीजवळ बिबट्या दिसल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. पावलांचे ठसे व इतर पुराव्यावरून प्रथमदर्शनी हा प्राणी बिबट्या नव्हे तर तरस असावा, असा अंदाज आहे. तरस हाही हिंस्त्रच प्राणी आहे. नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे.
- शाम शिरसाट, वन परिक्षेत्र अधिकारी, आष्टी

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Some farmers near Ashti have seen leopards