सोनपेठच्या मजुरांना तामिळनाडूत मदत 

कृष्णा पिंगळे
Wednesday, 8 April 2020

सोनपेठ (जि.परभणी) तालुक्यातील वडगाव स्टेशन, उंदरवाडी व परिसरातील शेकडो मजूर ऊसतोडीसाठी तामिळनाडू राज्यातील त्रिची येथील कोठारी शुगर्ससह आजूबाजूच्या कारखान्यासाठी गेलेले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन झालेले असल्याने हे मजूर अडकून पडले आहेत.

सोनपेठ  (जि. परभणी) : सोनपेठ तालुक्यातील ऊसतोडीसाठी गेलेले शेकडो मजूर तामिळनाडू राज्यात अडकून पडले आहेत. या मजुरांना राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रयत्नामुळे मंगळवारी (ता. सात) तातडीने मदत मिळाली आहे.
सोनपेठ तालुक्यातील वडगाव स्टेशन, उंदरवाडी व परिसरातील शेकडो मजूर ऊसतोडीसाठी तामिळनाडू राज्यातील त्रिची येथील कोठारी शुगर्ससह आजूबाजूच्या कारखान्यासाठी गेलेले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन झालेले असल्याने हे मजूर आहे तिथेच अडकून पडले आहेत.  अडकून पडलेल्या मजुरांना आवश्यक ती साधनसामुग्री उपलब्ध होत नव्हती. काही दिवस स्थानिक लोकांनी मदत केली. परंतु, ती मदत पुरेशी होत नसल्याने मजुरांची उपासमार होऊ लागली. त्यामुळे मजुरांनी वडगाव येथील प्रहार संघटनेचे कार्यकर्ते रावसाहेब बचाटे यांच्यांशी संपर्क साधून तेथील परिस्थिती सांगीतली व मदतीसाठी विनंती केली. रावसाहेब बचाटे यांनी प्रहारचे संस्थापक व राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून मजुरांबाबत माहिती देऊन मदत मिळवून देण्याची विनंती केली. बच्चू कडू यांनी तत्काळ तामिळनाडू सरकारशी संपर्क करून अडकून पडलेल्या मजुरांना आवश्यक त्या गोष्टी उपलब्ध करून देण्यास सांगितले. 

हेही वाचा -​ कोरोना : १७४ जणांचे अहवाल निगेटिव्ह

 जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
सोनपेठ तालुक्यातील मजुरांना तामिळनाडू येथील प्रशासनाने जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या. मंगळवारी (ता. सात) लालगुडी येथील मजुरांना बच्चू भाऊ यांच्यामुळे मदत उपलब्ध झाली आहे. दोन दिवसांत तालुक्यातील अडकून पडलेल्या सर्व मजुरांपर्यंत मदत पोचणार असल्याचे प्रहारचे रावसाहेब बचाटे यांनी सांगितले. 

बच्चु कडु यांची तत्परता 
प्रहारच्या कार्यकर्त्यांनी सोनपेठ तालुक्यातील मजुरांची माहिती ता. सात रोजी सकाळी ११.३० वाजता देताच बच्चू कडू यांनी तातडीने तामिळनाडू प्रशासनाशी संपर्क साधून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मजुरांच्या एका टोळीला मदत उपलब्ध करून दिली. उर्वरित मजुरांना शोधून त्यांच्यापर्यंत मदत पोचविण्यासाठी तामिळनाडू पुरवठा विभाग करत आहे. पाच तासांत परराज्यातील मजुरांना मदत उपलब्ध करून दिल्याबद्दल सोनपेठ तालुक्यातील नागरिकांनी बच्चू कडू यांचे आभार व्यक्त केले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sonepeth workers help in Tamil Nadu,parbhani news