सोनपेठ-मानवत जाण्यासाठी रस्त्यापेक्षा नागरिकांना होडग्यांचा आधार 

कृष्णा पिंगळे 
Sunday, 13 December 2020

सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठच्या नागरिकांना दळणवळण करण्यासाठी आजही होडग्याचा आधार घ्यावा लागत आहे. सोनपेठला जोडणारा रस्ता अतिशय खराब असल्याने नागरिक आपल्या कामासाठी मानवतला जाण्यासाठी होडग्याचा वापर करतात. 

सोनपेठ ः सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठच्या नागरिकांना दळणवळण करण्यासाठी आजही होडग्याचा आधार घ्यावा लागत आहे. सोनपेठला जोडणारा रस्ता अतिशय खराब असल्याने नागरिक आपल्या कामासाठी मानवतला जाण्यासाठी होडग्याचा वापर करतात. होडग्यावरून मानवतला जाणे हे सोनपेठला रस्त्याने जाण्यापेक्षा अतिशय सोपे आहे. 

सोनपेठ तालुका मुख्यालयाशी जोडणारा रस्ता नसल्याने तालुक्यातील गोदाकाठचे नागरिक हे गोदावरी नदी ओलांडून दुसऱ्या तालुक्यात आपल्या दैनंदिन गरजांसाठी जाता येतात. गोदाकाठच्या बहुतांश गावांचा बाजारहाट व इतर गरजांसाठी संपुर्ण व्यवहार नदी पलीकडील मानवत तालुक्याशी होत आहे. खराब रस्त्यावरून सोनपेठला येण्यापेक्षा गोदाकाठचे नागरिक नदी ओलांडून मानवतला जाणे पसंद करतात. नदी ओलांडण्यासाठी पूल नसल्याने होडगे, कलई अशा पारंपरिक साधनांचा वापर करत आहेत. तालुक्यातील थडी उक्कडगाव, लोहिग्राम, गोळेगाव, शिरोरी आदी ठिकाणावरून गोदावरी नदी ओलांडण्यासाठी होडगे व कलईची व्यवस्था उपलब्ध आहे. 

हेही वाचा - औरंगाबाद शहरात रिमझिम पाऊस, दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण -

असा तयार करतात होडगा
व्यावसायिक वापराच्या थर्माकोलच्या सहाय्याने एक मजबूत होडगा तयार करण्यात येतो. त्यावर लाकडाच्या फळ्या बांधून त्याला मजबुती देण्यात येते. नदीच्या आरपार एक दोरी बांधून त्या दोरीला हाताने धरून होडग्यातील नागरिकांना नदीपार सोडण्यात येते. एका होडग्यावर एकावेळी सहा व्यक्ती व तीन मोटारसायकल असे एकूण सहा क्विंटल पर्यंतचे वजन वाहतूक करण्याची सुविधा या होडग्यावर केलेली आहे. यासाठी प्रतिव्यक्ती तीस रुपये घेतले जातात. दिवसभरात पन्नास हुन अधिक प्रवासी या होडग्यातून पैलतीर गाठतात. 

हेही वाचा - बिलोली तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू 

नागरिकांनी असंख्य आंदोलने केली तरीही, 
गोदाकाठच्या रस्त्यासाठी तब्बल आठ गावातील नागरिकांनी असंख्य आंदोलने केली. राजकीय पदाधिकारी हे नेहमीच या भागात आले की रस्त्याबाबत नागरिकांना आश्वासने देतात. मात्र, प्रत्यक्षात नागरिकांना आपल्या दैनंदिन व्यवहारासाठी होडग्यासारख्या असुरक्षित साधनांचा वापर करावा लागत आहे. 

रस्ता अतिशय खराब असल्याने पर्याय 
सोनपेठला जोडणारा रस्ता अतिशय खराब असल्याने नागरिक आपल्या कामासाठी मानवतला जाण्यासाठी होडग्याचा वापर करतात. होडग्यावरून मानवतला जाणे हे सोनपेठला रस्त्याने जाण्यापेक्षा अतिशय सोपे आहे, असे अनेकांना वाटते.  
- रामेश्वर चांदवडे, नागरिक. 

 

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sonpeth-Manavat is the basis of boats for the citizens rather than the road, Parbhani News

Tags
टॉपिकस
Topic Tags: