सोनपेठच्या नगराध्यक्षांसह चंद्रकांत राठोडांनी काँग्रेस सोडली | Congress Party | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nationalist Congress Party
सोनपेठच्या नगराध्यक्षांसह चंद्रकांत राठोडांनी काँग्रेस सोडली

सोनपेठच्या नगराध्यक्षांसह चंद्रकांत राठोडांनी काँग्रेस सोडली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सुधीर बिंदू / सकाळ वृत्तसेवा

सोनपेठ (जि.परभणी) : काँग्रेस पक्षाचे (Congress Party) चंद्रकांत राठोड यांनी आपल्या नगरसेवकांसह काँग्रेस पक्षाला रामराम ठोकुन राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात गुरुवारी (ता.११) पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील पालकमंत्री नबाब मलिक यांच्या उपस्थितीत सोनपेठ नगरपरिषदेवर (Sonpeth Municipal Council) एक हाती सत्ता असलेल्या चंद्रकांत राठोड यांनी नगराध्यक्षा जिजाबाई राठोड यांच्यासह नऊ नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या पक्षांतरामुळे सोनपेठ तालुका आता पुर्णपणे राष्ट्रवादीमय झाला आहे. तालुक्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थावर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व निर्माण झाले आहे. राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांच्या पुढाकाराने हा पक्षांतराचा कार्यक्रम झाला. राठोड यांच्यासमवेत सोनपेठ नगरपरिषदेच्या अध्यक्षा जिजाबाई राठोड, सदस्या योजना पाटील, माजी उपनगराध्यक्ष दिगांबर भाडुळे पाटील, सदस्या नलिनी चिमनगुंडे, चंद्रकला तिरमले, कुरेशी जुलेखाबी जिलाणी, राज सैदाबी जहीर, शेख मेराजबी इनुस, सदस्य रमाकांत राठोड, निलेश चंद्रकांत राठोड यांनी देखील पक्षात प्रवेश केला. या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माजी आमदार संदीप बजोरिया, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख तसेच परभणी जिल्ह्याचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा: लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात शाॅर्ट सर्किट, २४ बालके सुरक्षित

यावेळी पाटील यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद यात्रेदरम्यान राजेश विटेकर यांनी सांगितले होते की, परभणीत पक्षाची ताकद अधिक वाढणार आहे. आज तो दिवस आला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली. बंजारा समाजाचे नेतृत्व करणाऱ्या एका चांगल्या नेत्याचा आपल्या पक्षात प्रवेश झाला आहे. भविष्यात बंजारा समाजासाठी राज्य सरकारच्या अनेक योजना राबवू, असेही यावेळी जयंत पाटील यांनी आश्वसित केले. सोनपेठ नगरपालिका अधिक बळकट करण्यासाठी आजचा दिवस महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचेही ते म्हणाले. परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी कार्यकर्त्यांसमोर आपले विचार मांडले. परभणी जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. जिल्ह्यातील विकासाची कामे पक्षाच्या माध्यमातून आपण नक्की करू. राठोड यांच्या पक्ष प्रवेशानंतर परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत होईल, असे ते म्हणाले. तसेच ज्यांनी पक्षात प्रवेश केला आहे. त्यांना पक्षात योग्य तो सन्मान मिळेल हा विश्वास त्यांनी सर्वांना दिला. यावेळी सोनपेठ तालुक्यातील राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दशरथ सुर्यंवंशी, लक्ष्मीकांत देशमुख, मदन विटेकर, सुहास काळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व चंद्रकांत राठोड यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो :-चंद्रकांत राठोड यांनी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई येथे नगर सेवकां सह राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला

loading image
go to top