दुर्दैवी ! एकीकडे मतदान सुरु झालं आणि दुसरीकडं उमेदवाराला मृत्यूनं गाठलं

दीपक सोळंके
Friday, 15 January 2021

एकीकडे मतदान प्रकियेला सुरुवात झाली असताना अचानक ही घटना घडल्याने गावात स्मशान शांतता पसरली.

भोकरदन (जालना) : सकाळी मतदान प्रक्रियेला सुरुवात होताच उमेदवाराला हृदयविकाराचा जोरदार झटका आला व यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे मतदान केंद्राच्या बाजूलाच मतदानाच्या दिवशी त्यांच्यावर अंत्यसंस्काराची दुर्दैवी वेळ नातेवाईक व समर्थकांवर आली. ही घटना शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात असलेल्या कोठा दाभाडी या गावात घडली. प्रभाकर दादाराव शेजुळ (वय 60) असे निधन झालेल्या उमेदवाराचे नाव आहे.

मराठवाड्याच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील 86 ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी (ता.15) मतदान घेण्यात आले आहे. सकाळी सर्वत्र मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून, सर्व केंद्रावर दुपार पर्यंत शांततेत मतदान सुरू होते. दरम्यान तालुक्यातील कोठा दाभाडी या सात सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीसाठी देखील सकाळी मतदान प्रकिया सुरू झाली. त्यामुळे सर्वजण मतदान करण्याच्या व करून घेण्याचा धावपळीत असताना व मतदान सुरू होऊन अर्धा तास झाला असताना येथील वार्ड क्रमांक एक राजुरेश्वर ग्रामविकास पॅनलचे उमेदवार प्रभाकर दादाराव शेजुळ यांच्या छातीत अचानक दुखायला लागल्याने त्यांना तत्काळ जालना येथे उपचारासाठी घेऊन जात असताना बावणे पांगरी गावाजवळ रस्त्यातच त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एकीकडे मतदान प्रकियेला सुरुवात झाली असताना अचानक ही घटना घडल्याने गावात स्मशान शांतता पसरली. दरम्यान या घटनेची माहिती येथील मतदान केंद्राध्यक्षांनी तात्काळ तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी संतोष गोरड यांना कळविली. सुरू झालेली मतदान प्रक्रिया बंद करता येत नसल्याने ती तशीच सुरू ठेवण्यात आली. दरम्यान या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.
 
मतदान केंद्राच्या पाठिमागेच अंत्यसंस्कार

दरम्यान एकीकडे मतदान प्रक्रिया सुरू असताना दुपारी चार वाजेच्या सुमारास प्रभाकर शेजुळ यांच्यावर येथील मतदान केंद्राच्या पाठीमागे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, आई वडील असा मोठा परिवार आहे.

कोठा दाभाडी येथे उमेदवाराचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे कळाले, परंतु मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. या जागेचा निकाल निवडणूक आयोगाकडून सूचना येतील, त्याप्रमाणे जाहीर करण्यात येईल.   
- संतोष गोरड, तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी, भोकरदन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: As soon as the voting process started at Bhokardan, the candidate suffered a heart attack and died unfortunate