... या जिल्ह्यात ३७ टक्के पेरण्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

आता जायकवाडीसह अन्य प्रकल्पातील पाणी पाळी सोडण्याची प्रतिक्षा शेतकऱ्यांना लागली आहे.

परभणी ः अतिवृष्टीमुळे लवकर वाफसा न झाल्याने एवढे दिवस रखडत सुरू असलेल्या रब्बी पेरण्यांनी आता वेग घेतला आहे. आतापर्यंत ३७ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. येत्या पंधरवाड्यात ज्वारी आणि हरबऱ्याच्या पेरण्या पूर्ण होतील, असा अंदाज आहे. आता जायकवाडीसह अन्य प्रकल्पातील पाणी पाळी सोडण्याची प्रतिक्षा शेतकऱ्यांना लागली आहे.

 दरवर्षी ऑक्टोबर महिण्या सुरू होणाऱ्या रब्बी पेरण्या यंदा अतिवृष्टीमुळे नोव्हेंबर महिण्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू झाल्या आहेत. वाफसा नसल्याने आणि तणकट काढण्यास वेळ लागल्याने पेरण्या लांबल्या होत्या. आता मात्र पेरण्यांनी चांगलाच वेग घेतला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३७.७० टक्के पेरणी झाली आहे. 

रब्बीसाठी दोन लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित
यंदा रब्बीसाठी दोन लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. त्यातील ज्वारी एक लाख ५९ हजार ७५ हेक्टरपैकी ७२ हजार ७६३ हेक्टरवर (४३.७४ टक्के) पेरणी झाली आहे. हरभरा ५३ हजार ६४ हेक्टरपैकी २० हजार सात हेक्टर (५४.५७) गहु ३५ हजारपैकी चार हजार (११ टक्के) यासह एक लाख चार हजार ७३६ (३७.७० टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

धरणांतील पाणी सोडल्यास फायदा
जायकवाडी धरणाचे सर्वात जास्त लाभक्षेत्र हे परभणी जिल्ह्यात आहे.तब्बल ९७ हजार ४०० हेक्टर एवढे लाभ क्षेत्र आहे. तर माजलगाव धरणाचे परभणी जिल्ह्यातील ५८ हजार ३८५ हेक्टर लाभक्षेत्र आहे. येलदरी धरणाचे लाभ क्षेत्र २२ हजार १४२ हेक्‍टरवर आहे. करपरा मध्यम प्रकल्पावर एक हजार ५० हेक्टर तर मासोळी प्रकल्पावर एक हजार ३५० हेक्टर सिंचनाचे क्षेत्र आहे. तर लघु प्रकल्पावर एकुण एक हजार ४५६ हेक्टर अशी दोन्ही मिळुन तीन हजार ८५६ हेक्टर जमिन सिंचनाखाली आहे. त्यामुळे या सर्वच धरणातून आता रब्बी हंगामासाठी कधी पाणी सोडतात याची प्रतिक्षा लागली आहे. गहु, हरभरा आणि उन्हाळी पिकांसाठी याचा लाभ होणार आहे.

गहु, हरभऱ्याचा पेरा वाढणार
जिल्ह्यात यंदा सर्वच प्रकल्प तुडूंब असल्याने आणि विहिरी, कुपनलिकांना देखील पाणी वाढल्याने गहु आणि हरभरा पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल दिसुन येत आहे. त्यामुळे कालव्याद्वारे पाणी आल्यानंतर गहु आणि हरभरा पिकांचा पेरा वाढणार आहे. परिणामी, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक चांगले आल्यास त्याचा फायदा आगामी काळात उत्पन्न वाढीसाठी होणार आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sowing 37 percent in this district