शेतकरी लागला पुन्हा जोमाने कामाला, पेरणीस सुरवात

संजय जाधव
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

पाण्याची कमतरता भासत नाही. रब्बी हंगामात सहसा शेतकऱ्यांचा गव्हाच्या पिकाकडे ओढा असतो. मात्र खरिपात मका पिकावर पडलेली लष्करी अळी, त्यानंतर पडलेला अवकाळी पाऊस यामुळे मकाचे बाजारभाव वाढण्याची शक्‍यता असल्याचे बोलले जाते.

कन्नड (जि. औरंगाबाद) - अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडातील घास हिरावला गेला. मका, सोयाबीन, कापसासह फळबागांना मोठा फटका बसला. शासनाकडून  मदतीची घोषणा झाली. महाविकास आघाडीचे शासन सत्तेत आले.त्यांनीही मदतीसह संपूर्ण कर्जमाफीची शक्‍यता वर्तवली. मात्र, अजून कोणतीही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचली नाही. दुसरीकडे शेतकऱ्यांवर झालेले आघात विसरून शेतकरी पुन्हा जोमाने कामाला लागल्याचे चित्र आहे. कितीही संकटे आले तरी शेतकऱ्याला घरखर्च चुकला नाही. मुलाबाळांचे  शिक्षण,आजार,शेती खर्च करावाच लागतो.या विवंचनेतून शेतकरी पुन्हा शेतात मोठ्या आशेने रब्बी हंगामाच्या तयारीला लागला आहे. 

दरम्यान यंदा झालेल्या पावसाने कन्नड परिसरातील नदी,नाले,धरणे,तलाव, विहिरी भरल्या आहेत. पाण्याची कमतरता भासत नाही. रब्बी हंगामात सहसा शेतकऱ्यांचा गव्हाच्या पिकाकडे ओढा असतो. मात्र खरिपात मका पिकावर पडलेली लष्करी अळी, त्यानंतर पडलेला अवकाळी पाऊस यामुळे मकाचे बाजारभाव वाढण्याची शक्‍यता असल्याचे बोलले जाते. तसेच कांदा, टोमॅटोचाही भाव वाढला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी गव्हाएैवजी मका,कांदा बीजवाई, टोमॅटो यासारख्या पिकांना पसंती दिली आहे. रब्बी हंगामात मका, टोमॅटो, कांदा पिकांचे मोठे उत्पादन होण्याची शक्‍यता आहे. 

सध्या मकाची शासकीय भरड धान्य योजनेतून हमी भावाने शासनाकडून खरेदीस सुरुवात झाली नाही. मात्र प्रत्यक्षात मकाचे बाजारभाव शासकीय आधारभूत किंमतीपेक्षा जास्त आहेत. सुरुवातीला एक हजार ते बाराशे रुपये प्रति क्विंटल असलेला मक्‍याचा भाव सध्या बाराशे ते एकोणाविसशे रुपये प्रति क्विंटल असा आहे. नजीकच्या काळात मक्‍याचे भाव वाढण्याची  शक्‍यता असल्याचे शेतकरी, व्यापाऱ्यांनी सांगितले. 

संबंधित बातमी - शेतकरी महिलेने फुलविला कलकत्ता पानमळा

सध्या उन्हाळी कांद्याचे भाव 70 ते 100 रुपयेपर्यत गेला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी समाधानी आहे. मात्र, सध्या शेतकऱ्यांकडे साठवणुकीचा कांदा शिल्लक असण्याची शक्‍यता कमीच आहे. मात्र पुढील हंगामात कांद्याला चांगला भाव मिळेल, या आशेने शेतकरी उशिरा कांदा रोपे तयार करताना दिसत आहेत. एकूणच शेती व्यवसाय हा जुगार असल्याचे वारंवार सिद्ध झालेले असूनही शेतकरी भूतकाळातील दुःख बाजूला सारून पुन्हा नव्या जोमाने कामाला लागला आहे. 

रब्बी मका लागवड क्षेत्रात दुपटीने वाढ 
तालुक्‍यातील एकूण 15 हजार 308 हेक्‍टर रब्बी सरासरी लागवडीयोग्य क्षेत्रापैकी मंगळवार (ता.तीन) अखेर आठ हजार 807 हेक्‍टरवर (57.43 टक्के) लागवड झाली. यंदा मका लागवड क्षेत्रात दुपटीने वाढ झाली असून, 721 हेक्‍टर सरासरी लागवड क्षेत्र वाढून तब्बल 1346 हेक्‍टर (186.69 टक्के) लागवड झाली आहे. गव्हाचे लागवड क्षेत्र कमी होऊन 6283 पैकी 3325 हेक्‍टर (52.92 टक्के) लागवड झाली आहे. रब्बी ज्वारी 1439 पैकी 1249 हेक्‍टर(86.80 टक्के),हरभरा 6438 पैकी 2842 हेक्‍टर (57.43 टक्के) लागवड झाली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sowing started in Aurangabad District