शेतकरी महिलेने फुलविला कलकत्ता पानमळा

अविनाश काळे
बुधवार, 4 डिसेंबर 2019

शिक्षित शेतकरी महिलेने आधुनिक तंत्राची कास धरत कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न घेण्याचा यशस्वी प्रयत्न सुरू ठेवला आहे. दहा गुंठे क्षेत्रावर शेडनेट उभारुन कलकत्ता पान मळ्याची शेती साकारली आहे.

उमरगा (जि. उस्मानाबाद) : उमरगा तालुक्‍यातील कुन्हाळी येथील शिक्षित शेतकरी महिलेने आधुनिक शेती तंत्राचा अवलंब करीत कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न घेण्याचा यशस्वी प्रयत्न सुरू ठेवला आहे. जरबेरा फुलांद्वारे उत्पन्न घेऊन समृद्धी साधण्याचा यशस्वी प्रयत्न सुरू असतानाच आता कलकत्ता पान मळ्याची शेती साकारली आहे. त्यासाठी दहा गुंठे क्षेत्रात शेडनेट उभारले आहे. त्यांना पानाचे उत्पादन मिळू लागले आहे. वैशाली कैलास आष्टे असे या शेतकरी महिलेचे नाव आहे.

आधुनिक तंत्राचा अवलंब 
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेती व्यवसायाला बसतो आहे. त्यामुळे काही शेतकरी प्रयोगशीलतेची कास धरत आहेत. कमी पाण्यावर अधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. कुन्हाळी येथील वैशाली आष्टे यांनीही तसा निर्णय घेतला. आधुनिक तंत्राचा अवलंब करीत त्यांनी 2014 मध्ये साडेबारा लाख रुपये खर्चून पॉलिहाऊसची उभारणी केली. त्यात जरबेरा फुलांचा प्रयोग केला आणि तो यशस्वी झाला. जरबेरा फुलांच्या उत्पादनाचे हे दुसरे वर्ष आहे. यातून आतापर्यंत त्यांना सात लाखांचा नफा झाला आहे. तालुक्‍यातील कुन्हाळी, तलमोड, तुरोरी, कोळसूर आदी गावे साध्या पानमळ्यासाठी प्रसिद्ध होती. कालांतराने ही शेती कमी झाली; मात्र सौ. आष्टे यांनी साध्या पानमळ्यापेक्षा पश्‍चिम बंगाल राज्यात होणाऱ्या कलकत्ता पानाचे उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा प्रयोग मराठवाड्यातच नव्हे, तर राज्यात पहिलाच असावा, असे सांगण्यात येते. 

हेही वाचा : अखेर असा पकडला बिबट्या  

असे केले नियोजन 
पश्‍चिम बंगालमध्ये कलकत्ता पानाचे उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रात साध्या पानांचे मळे आहेत. कलकत्ता पान सर्वत्र प्रसिद्ध आहे. कलकत्ता मसाला पान आवडीने खाल्ले जाते. शहरांतील पान दुकानांत या पानासाठी फ्रीजची व्यवस्था असते. लग्नसमारंभात या पानाची चव निमंत्रितांना दिली जाते. तुलनात्मक हे पान आकाराने मोठे, काहीसे जाड आणि बऱ्यापैकी टिकाऊ असते. वैशाली आणि पती कैलास आष्टे यांनी कलत्ता पान शेतीचा प्रयोग जाणून घेण्यासाठी पश्‍चिम बंगाल गाठले. तेथे आवश्‍यक ती माहिती घेतली. परतल्यावर अडीच लाख खर्चून शेडनेटची उभारणी केली. नुगी, शेवगा, हदगा, सडा या झाडांच्या आधारावर पानांचे वेल सोडण्यापेक्षा निर्जीव बांबूचा वापर करून त्यावर वेल सोडण्याची पद्धत अवलंबिली. त्यासाठी पाहिल्यांदा शेतात लाल माती मोठ्या प्रमाणात टाकली. बेणं लावण्यासाठी पाच बाय तीन फुटांच्या वाफा तयार केल्या. चार कांड्याचे (पानाचे) एक बेणं असते. त्यातील दोन कांड्या जमिनीत पुराव्या लागतात. त्या पद्धतीने एक फुटाच्या अंतरावर एक बेणं अशी लागवड केली. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात लागवड पूर्ण झाली. साधारणतः चार महिन्यांनी पानांचा आकार मोठा होतो. गेल्या आठ दिवसांपासून पानांची विक्री स्थानिक पानटपरीत सुरू करण्यात आली आहे. दीडशे ते दोनशे रुपये शेकडा पानाला दर मिळत आहे. आतापर्यंत दहा हजार पानांची विक्री झाली आहे. 

येथे क्‍लिक करा : पंकजा मुंडे यांची पोस्ट, भावनिक आवाहन 

वीस वर्षांचे श्वाश्वत उत्पन्न 
कलकत्ता पानमळ्यातून साधारणतः वीस वर्षांपर्यंत उत्पादन घेता येते. 
वैशाली आष्टे यांनी पानमळ्यासाठी सुमारे पाच लाखांची गुंतवणूक केली आहे. साधारणतः पाच ते सहा महिन्यांनंतर पानांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात मिळते. जानेवारीपासून होणाऱ्या पान खुडणीतून जवळपास चाळीस हजार पाने निघतील अशी स्थिती आहे. पानांचे उत्पादन घेत असताना उतरण पद्धतीने वेल जमिनीत पुरायचे असते. त्यामुळे पुढचा खर्च कमी येतो. उतरण पद्धतीच्या लागवडीमुळे वेल बहरते आणि जूनपासून प्रतिमहिना साठ हजारांपर्यंत पाने मिळू शकतात. पानमळ्याद्वारे वीस वर्षांपर्यंत शाश्‍वत उत्पादन मिळू शकते. दरम्यान, पानांना लातूर येथून मोठी मागणी असून सध्या स्थानिक बाजारपेठेत विक्री सुरू असल्याचे आष्टे यांनी सांगितले. 

आधुनिक तंत्राचा अवलंब करून कमी क्षेत्रात अधिक उत्पादन, उत्पन्न घेता येते. जरबेरा फुलाने चांगली साथ दिल्याने समृद्धीचा मार्ग मिळाला. कलकत्ता पानमळ्याचा प्रयोग कठीण वाटत होता; मात्र धाडस केले, नियोजन करून ते तडीस नेले. यासाठी पतीचीही चांगली साथ मिळाली. सध्या काही प्रमाणात पाने परिपक्व झाली आहेत. स्थानिक बाजारपेठेत विक्री सुरू आहे. जानेवारीपासून उत्पादन वाढेल. श्वाश्वत शेतीचा हा पहिला प्रयोग यशस्वी करण्यासाठी जिद्द, मेहनत कायम ठेवणार आहे. 
- वैशाली कैलास आष्टे, कुन्हाळी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Calcutta leafy flower blooms by a farmer woman