esakal | मराठवाड्यातील मुख्य पिक सोयाबीन धोक्याच्या पातळीवर
sakal

बोलून बातमी शोधा

मराठवाड्यातील मुख्य पिक 'सोयाबीन' धोक्याच्या पातळीवर

मराठवाड्यातील मुख्य पिक 'सोयाबीन' धोक्याच्या पातळीवर

sakal_logo
By
जलील पठाण.

औसा : अल्पावधीत मराठवाड्यात प्रमुख पिकाची जागा घेतलेले सोयाबीन पिक आता धोक्याच्या पातळीवर येऊन पोहोचले असुन भविष्यात शेतकऱ्यांनी शास्त्रज्ञांनी सुचविलेल्या सुचनांकडे दुर्लक्ष केले तर हे पिक फायदेशीर ठरणार नसल्याचे सांगीतले जात आहे. यंदा या पिकावर सोयामोझॅक, खोडमाशी, चक्रीभुंगा, गोगलगाय याच्यासह बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसला.

हेही वाचा: पुण्याच्या पोलिसांकडून आठ लाखाचा गुटखा जप्त

याचा मोठा फटका उत्पादनावर होतांना दिसुन येत आहे. भविष्यातही या किड रोगाची व्याप्ती वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने शेतकऱ्यांसह शास्त्रज्ञांची चिंता वाढली आहे. बागायती व कोरडवाहू या दोन्ही जमीनीसाठी सोयाबीन हे वरदान ठरले आहे. लातूर-ऊस्मानाबाद जिल्ह्यात खरीपात हे पिक ऐंशी टक्के क्षेत्रावर घेतले जाते.

मात्र मागील दशकापासून पिक पद्धतीत झालेल्या बदलामुळे आता हे पिक धोक्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. यंदा सोयाबीन लहान असतांना कधी नव्हे एवढा गोगलगायीचा प्रादुर्भाव झाला. शेकडो एकरावरचे कोवळे पिक या गोगलगायांनी फस्त करुन टाकले. त्याच बरोबर वाढीच्या अवस्थेत खोडमाशी आणि चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्याने झाडे सुकुन गेली तर कांही आता शेंगा पक्व होण्याच्या अवस्थेत मरत आहेत.

काही ठिकाणी सोयामोझॅकच्या प्रादुर्भावाने झाडे वाझ निपजली. शेंगावर आणि पाणावर करपा (हाळद्या) रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने अवेळी पाने पिवळी पडून गळुन गेली तर शेंगांना बुरशी लागली. याबाबत मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ संदीप देशमुख यांनी केलेल्या अभ्यासानुसार सोयाबीन पिकांच्या वाढत्या आडचणीवर कांही मुद्दे मांडले आहेत.

सोयाबीन-हरभरा पिकाची सतत पेरणी, यामुळे हाणीकारक बुरशींचा जमिनीत वाढता शिरकाव.

खोडमाशी, चक्रीभुंग्याचे वेळेत नियंत्रण न केल्याने उत्पादनात प्रचंड घट

पिकवाढीच्या कालावधीत दरवर्षी पावसाचा पडणारा खंड व याच कालावधीत शेतकऱ्यांचे पिकाकडे होणारे दुर्लक्ष

उपाय योजना

सुरुवातीचे विस दिवस किंडींपासून संरक्षण होण्यासाठी पेरतेवेळेस थायोमोथॉक्सम ३० एफ.एस १० मिली, किंवा इमिडाक्लोप्रिड ४८ एफ.एस. १.२५ मिली प्रति किलो बियाण्याला बिजप्रक्रिया करावी.

चक्रीभुंगा व खोडमाशीच्या नियंत्रणासाठी थायक्लोप्रिड २१.७ एससी. १.५ मिली, प्रोफेनोफॉस ५० ईसी २ मिली, बिटासायफ्लुथ्रीन+इमिडाक्लोप्रिड ०.७५ मिली, थायोमोथॉक्साम+ लॅम्बडासायलोथ्रिन ०.२५ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

बुरशीजन्य करपा हा सुप्तावस्थेत पिक पेरल्या पासुन फळधारणा अवस्थे पर्यंत दिसुन येतो. सतत एकच प्रकारच्या पिकांची लागवड केल्यामुळे हा रोग बळावतो. यासाठी पिकांची फेरपालट करावी, दर्जेदार बुरशीनाशकांचा वापर करावा, यामध्ये जैवीक बुरशीनाशके जास्त फायदेशीर ठरु शकतात.

loading image
go to top