
लातूर : लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या भावात वाढ होत आहे. त्यात या हंगामातील सर्वाधिक भाव बुधवारी मिळाला. सोयाबीन सात हजारी पार झाले. आता बाजारपेठेत सोयाबीनची आवक वाढण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात गतवर्षी चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे सोबायीनचा मोठ्या प्रमाणात पेरा झाला होता. साडे चार लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीन पेरले गेले होते. त्याला उताराही चांगला मिळाला. दिवाळीनंतर बाजारपेठेत सोयाबीन विक्रीसाठी येवू लागले होते.
पहिल्यापासून साडे पाच ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलला भाव राहिला आहे. भाव वाढतील, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सोयाबीन तसेच घरी ठेवल्याचे चित्रही पाहायला मिळत होते. हंगामात दररोज ५० ते ६० हजार क्विंटल सोयाबीनची आवक असते, ती केवळ २० ते २५ हजार क्विंटलवर आली होती. पण, फेब्रुवारीच्या सुरवातीपासूनच सोयाबीनचा बाजार वधारला जात होता. पंधरा दिवसांत तर हे भाव वाढत गेले. गेल्या पंधरा दिवसांत आठशे ते हजार रुपये क्विंटल मागे भाव वाढला आहे. मंगळवारी येथील आडत बाजारात सोयाबीनचा भाव सहा हजार ९०० होता. तर, तो बुधवारी सात हजार १५० वर गेला. सरासरी भाव सात हजार रुपये राहिला आहे. भाव वाढत असल्याने बाजारपेठेतील आवकही वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांतही आता समाधान व्यक्त केले जात आहे.
साठ्यांवरील मर्यादा शेतकऱ्यांना मारक
गतवर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाल्यामुळे तेलबियांचा तुटवडा निर्माण झाला आहे. आता सोयाबीनला चांगले दर मिळू लागले. खाद्यतेल व पेंडीचे दर वाढल्यामुळे तेल व्यावसायिक व पोल्ट्री व्यवसायिकांच्या दबावामुळे केंद्र शासनाने परदेशातून तेलाची आयात केली, पेंडीची आयात केली, आयात शुल्क शून्य केले, वायदेबाजारावर बंदी घातली व ३१ मार्च २०२२ पर्यंत साठ्यांवर मर्यादा घातली होती. याचा परिणाम थेट तेलबियांच्या किमतीवर झाला. नऊ हजार हजार रुपये क्विंटल दराने विकणारे सोयाबीन पाच हजार रुपयांपर्यंत घसरले. आता पुन्हा सोयाबीनला तेजी येत असताना तेलबियांच्या साठ्यांवरील मर्यादेची मुदत ता. ३० जूनपर्यंत वाढवली आहे. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाचा तोटा शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे. सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही तर आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष रूपेश शंके यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.