तीन दिवसांत २६६ आरोपींवर दारू, जुगाराचे १९२ गुन्हे नोंद ; एसपी रामास्वामींची धडक मोहिम

दत्ता देशमुख
Monday, 28 September 2020

बीडचे नवे पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी यांनीही अवैध धंद्यांविरुद्ध जोरदार मोहीम हाती घेतली आहे.

बीड : नवे पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी यांनीही अवैध धंद्यांविरुद्ध जोरदार मोहीम हाती घेतली आहे. मागच्या तीन दिवसांत जिल्हाभरात अवैध दारू विक्री आणि जुगाराचे तब्बल १९२ गुन्हे नोंद करण्यात आले. यामध्ये २६६ आरोपींवर कारवाई करून त्यांच्याकडून ११ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जिल्ह्यात अवैध दारू विक्री, मटका, पत्त्यांचे क्लब असे अवैध धंदे जोरात आहेत. नुकतेच रुजू झालेले पोलिस अधीक्षक अशा धंद्यांबाबत काय निर्णय घेतात, याकडे लक्ष होते. राजा रामास्वामी यांनी सुरवातीला ठाण्यांना भेटी देऊन अवैध धंद्यांविरुद्ध कारवाईचे आदेश ठाणे प्रमुखांना दिले. त्यानुसार शुक्रवार (ता. २५) ते रविवार (ता. २७) या तीन दिवसांत अवैध दारू विक्री प्रकरणी १४६ गुन्हे नोंद करून १५७ आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

केंद्र शासनाच्या विरोधात `राष्ट्रवादी`चे गोट्या खेळो आंदोलन, लातुरात अनोख्या...

या आरोपींकडून आठ लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, तर अवैध जुगाराच्या ४६ गुन्ह्यांमध्ये १०९ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून तीन लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध दारू विक्री व जुगारांविरुद्ध सुरवातीलाच कारवाईचा बडगा उगारून राजा रामास्वामी यांनी ओपनिंग जोरदार केली आहे.
 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SP Ramaswamy Campaign Against Illegal Business Beed News

Tags
टॉपिकस
Topic Tags: