रस्त्यावर थुंकणे पडले महागात

अनिल कदम
Wednesday, 15 April 2020


शहरातील जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी - विक्रीसाठी होत असलेली गर्दी लक्षात घेऊन या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी व सोशल डिस्टन्सचा अवलंब करण्यासाठी (ता. १५) एप्रिलपासून शहरातील किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने व फळ विक्रीचे दुकाने दोन दिवसांआड, तेही सकाळी सात ते ११ या वेळेतच उघडी ठेवण्याचे निर्बंध घालण्यात आले आहेत. लॉकडाउनचा (ता.तीन) मे चा कालावधी गृहीत धरला तर या कालावधीत ही दुकाने फक्त पाच दिवसच खुली ठेवली जाणार आहेत.

देगलूर, (जि. नांदेड) ः सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर थुंकणे, कापडी मास्क अथवा हात रुमाल न लावता घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने बुधवारी (ता. १५) दंडात्मक कार्यवाहीचा बडगा उगारल्याने अनेकांची धांदल उडाली. सकाळपासून केलेल्या कार्यवाहीत शहरातील २१ जणांना याप्रकरणी चार हजार ७०० रुपयांचा दंडही लावण्यात आला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी मंगळवारी (ता. १४) जिल्ह्यातील नागरिकांना घराबाहेर पडताना मास्कचा वापर करण्यासंदर्भातचे आदेश जारी केले होते. त्याची अंमलबजावणी (ता.१५) बुधवारी देगलूरमध्ये प्रशासनातर्फे करण्यात आली.

 

हेही वाचा - नांदेडला औद्योगिक न्यायालयाच्या इमारतीसाठी प्रयत्न
 

बुधवार (ता. १५) सकाळपासूनच प्रशासनातर्फे विशेष मोहीम शहरात राबविण्यात आली. या वेळी दुचाकीवर अनावश्यक कामासाठी फिरणाऱ्यांना जाब विचारून त्यांच्यावरही कडक कार्यवाहीचा इशारा देण्यात आला. या वेळी तोंडावर मास्क न लावणारे व रस्त्यावर थुंकणाऱ्या नागरिकांना दंड लावण्यात आला. या वेळी उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, तहसीलदार अरविंद बोळंगे, पोलिस उपविभागीय अधिकारी रमेश सरोदे, मुख्याधिकारी गंगाधर ईरलाेड, सहायक पोलिस निरीक्षक संगमनाथ परगेवार यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

चढ्या भावाने माल विकी करणाऱ्यांवर करडी नजर
संचारबंदीचा फायदा उठवत काही व्यापारी किराणा सामानांची चढ्या भावाने विक्री करीत असल्याचे दिसून येत असून त्यांच्यावर प्रशासनातर्फे करडी नजर ठेवली जात आहे. नागरिकांच्या अशा प्रकरणात त्या व्यापाऱ्यांसंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या तर त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्याचा इशारा उपजिल्हाधिकारी शक्ती कदम यांनी दिला आहे.

अवैद्य दारूचा सुळसुळाट 
शहरासह ग्रामीण भागात अवैद्य दारू विक्रीचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट सुरू असून यामध्येही साठेमारी चालवली जात आहे. खेडेगावात तर रसायनमिश्रित शिंदीची अगदी खुलेआम विक्री सुरू असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. उत्पादन शुल्क खाते मात्र कार्यवाहीचा डांगोरा पिटवीत आहे. त्यांची कार्यवाही म्हणजे डोंगर पोखरून उंदीर पकडण्याचा प्रकार होय. शहापूर येथे गेल्या आठवड्यात पोलिसांनी केलेली कार्यवाही अनेकांना लाभदायक ठरली असली तरी अनेकांना बरेच काही सांगून गेली आहे. त्यामुळे वरिष्ठांनी कोरोना विषाणूच्या संक्रमण कालावधीत याकडे गांभीर्याने बघण्याची गरज असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त केले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Spit on the street was expensive, nanded news