निर्जंतुकीकरणासाठी उस्मानाबादेत फवारणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 मार्च 2020

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उस्मानाबाद शहरात पालिकेने निर्जंतुकीकरणासाठी अग्निशमन दलाच्या वाहनाच्या साहाय्याने फवारणी सुरू केली आहे 

उस्मानाबाद : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेने निर्जंतुकीकरणासाठी अग्निशमन दलाच्या वाहनाच्या साहाय्याने फवारणी सुरू केली आहे. संपूर्ण शहरात फवारणी केली जाणार असून, यातून कोरोना विषाणूसह अन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी व्यक्त केली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासन स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. सर्वत्र संचारबंदी लागू केल्याने फैलाव रोखण्यास मदत होणार आहे. एसटी बस, रेल्वे, खासगी वाहतूक बंद असल्याने साखळी तुटण्यास मदत होत आहे. केंद्र आणि राज्याने विविध उपाययोजना केल्यानंतर आता स्थानिक प्रशासनानेही नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत.

उस्मानाबाद पालिकेने आतापर्यंत शहरात अनेक ठिकाणी नागरिकांना हात धुण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विशेष म्हणजे नागरिकांनी घराबाहेर पडू नये. यासाठी प्रत्येक गरजूला घरपोच धान्य, भाजीपाला, दूध देण्याचा अनोखा प्रयोग सुरू केला आहे. त्यानंतर शहर परिसराच्या स्वच्छतेसाठी निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया सुरू केली आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

अग्निशमनच्या वाहनातून फवारणी 
पालिकेकडे असलेल्या अग्निशमन दलाच्या वाहनातून निर्जंतुकीकरणासाठी फवारणी सुरू केली आहे. गुरुवारी (ता. २६) शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, काळा मारुती चौक, नेहरू चौकात फवारणी करून या मोहिमेला सुरवात केली. यापूर्वी छोट्याशा मोटारीतून फवारणी केली जात होती. त्यामुळे वेळ आणि पैसाही जास्तीचा लागत होता. आता मात्र अग्निशमनच्या दलाच्या वाहनातून फवारणी करण्याचे नियोजन केल्याने शहराचा प्रत्येक भाग फवारणी करून पूर्ण होईल.

आतापर्यंत शहरात कोरोनाबाधित अथवा संशयित रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे यापुढेही कोरोनाचा शिरकाव शहरात होऊ नये, त्यासाठी संपूर्ण शहरात फवारणी केली जात आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत शहराचा संपूर्ण परिसर फवारून पूर्ण होईल, अशी अपेक्षा असल्याचे मत नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी व्यक्त केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Spray In Osmanabad For Sterilization