स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात बस आली, झाला आनंद   

बालाजी बोराडे
सोमवार, 29 जुलै 2019

उमाचीवाडी (ता. भूम) येथे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बस सोमवारी (ता. 29) सुरू करण्यात आली.

पाथरूड (जि. उस्मानाबाद) - भूम आगाराच्या वतीने प्रवाशांच्या सेवेसाठी उमाचीवाडी (ता. भूम) येथे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बस सोमवारी (ता. 29) सुरू करण्यात आली. गावात बस येताच ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. बससेवेमुळे नागरिकांची दीर्घकाळ सुरू असलेली पायपीट थांबली आहे. 

उमाचीवाडी हे गाव पाथरूड-ईट रस्त्यावरून दोन किलोमीटरवर डोंगराच्या कुशीत वसले आहे. या गावाची लोकसंख्या एक हजार आहे. येथील ग्रामस्थांना आठवडे बाजार व तालुक्‍याच्या कामासाठी पाथरूड किंवा ईट येथून बसने प्रवास करावा लागत होता. गावात जिल्हा परिषदेची चौथीपर्यंत शिक्षणाची सोय होती. पुढील शिक्षणासाठी पाथरूडला पायी किंवा खासगी वाहनाने प्रवास करावा लागत होता. ही समस्या ग्रामस्थांनी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याकडे मांडली होती. त्यांच्या शिफारशीवरून गावात बससेवा सुरू झाली आहे. 

उमाचीवाडी येथे सकाळी साडेआठ व सायंकाळी पाचला अशा बसच्या दोन फेऱ्या सुरू करण्यात आल्याने शालेय विद्यार्थ्यांची सोय झाली आहे. गावात पहिली बस येताच माजी सरपंच प्रकाश शेळके, हनुमंत गावडे, सुभाष शेळके, आकाश शेळके, माजी सरपंच धनंजय शेळके यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. वाहक वाघमारे व चालक पाटील यांचा ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला. यावेळी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. चेतन बोराडे, सरपंच सुरेश ठोंबरे, उपसरपंच तात्या शेळके आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. युवा सेनेच्या प्रयत्नाने प्रथमच गावात बस आल्याने ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत येत होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST bus service started at Umachiwadi (Ta. Bhum)