मराठवाड्यातील अठरा हजारांवर कारखान्यांचे शटर अद्याप डाउनच

Marathwada Industry News
Marathwada Industry News
Updated on

लातूर ः कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाउन दोनमध्ये शासनाने कारखाने, उद्योगांना थोडीशी शिथिलता दिली. त्यामुळे उद्योग सुरू होतील असे वाटत होते. कच्च्या मालाचा प्रश्न, माल तयार केला तर बाजारपेठेचा प्रश्न, शासनाच्या वेगवेगळ्या अटी, वाहतुकीच्या अडचणी आदी समस्यांमुळे मराठवाड्यातील अनेक उद्योगांची चाके अद्यापही कोरोनाच्या संकटातच रुतलेली आहेत. मराठवाड्यातील २० हजार ३८८ पैकी केवळ एक हजार ६८८ कारखाने सुरू झाले आहेत. १८ हजार ७०० कारखान्यांचे शटर अद्यापही डाउनच आहे. हे कारखाने सुरू करण्यासंदर्भात शासनाने ठोस भूमिका घेतली तरच कामगारांच्या हाताला काम मिळणार आहे.


जाचक अटींचा परिणाम
दुसऱ्‍या लॉकडाउनमध्ये उद्योगांना अटी घालून शासनाने थोडी शिथिलता दिली. कारखाना सुरू करायचा असेल तर कामगारांची राहण्याची सोय कारखान्यातच करावी किंवा त्यांना ने-आण करण्यासाठी मिनीबस उपलब्ध करून द्याव्यात या दोन अटी टाकल्या आहेत. उद्योजकांना या अटी मान्य नाहीत. त्यामुळे त्यांचा पुनर्विचार गरजेचा असल्याचे मत व्यक्त होत आहे. परराज्यांतील कामगार निघून गेल्याने उद्योजकांना कामगारांचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे कारखाने सुरू करता येत नाहीत.

कच्चा माल येईना, पक्का माल जाईना
मराठवाड्यातील अनेक कारखान्यांना कच्चा माल पुणे, मुंबई व इतर मोठ्या शहरांतून येतो. अनेक कारखाने परराज्यांतूनही कच्चा माल आणतात. लॉकडाउनमुळे हा माल येणे बंद झाले आहे. दुसरीकडे उपलब्ध कच्च्या मालापासून पक्का माल तयार केला तर त्याला बाजारपेठच नाही. माल दुसरीकडे पाठवता येत नाही. माल तयार करून करायचे काय, असा प्रश्नही उद्योजकांसमोर आहे. हळुहळू बाजारपेठा सुरू झाल्या तरच उद्योग सुरू होतील.

महापालिकेच्या हद्दीवर बंधने
महापालिकेच्या हद्दीतील उद्योग सुरू करण्यास परवानगी नाही. मराठवाड्यात महापालिकेच्या हद्दीत अनेक
उद्योग आहेत. शासनाच्या अटीमुळे ते सुरू होऊ शकत नाहीत. मराठवाड्यात २० हजार ३८८ पैकी केवळ एक हजार ६८८ कारखाने सुरू झाले आहेत. यात एमआयडीसी हद्दीतील पाच हजार २०१ पैकी एक हजार १६८ तर एमआयडीसी हद्दीबाहेरील १५ हजार १८७ पैकी ५४० कारखानेच सुरू झाले आहेत. एकूण १७ हजार ८०० कारखान्यांची चाके अद्यापही बंदच आहेत. यातून लाखो कामगारांचा रोजगार बुडत आहे.


कारखानास्थळी शेकडो कामगारांची राहण्याची किंवा त्यांना ने-आण करण्यासाठी मिनीबसची व्यवस्था करणे ही अट जाचक आहे. त्यामुळे उद्योजक पुढे येत नाहीत. ही अट शिथिल करण्यासाठी शासनाने विचार केला पाहिजे. बाजारपेठा बंद असल्याने माल विकता येत नाही. काही बाजारपेठा हळुहळू सुरू करण्याची गरज आहे. तरच उद्योगांना चालना मिळेल.
- चंदूलाल बलदवा, अध्यक्ष, लातूर जिल्हा उद्योग समूह


महापालिका हद्द सोडून इतर सर्व ठिकाणचे उद्योग सुरू करण्यास परवानगी आहे. शासनाच्या या अटीचे पालन करून हे उद्योग सुरू होऊ शकतात. मालवाहतुकीची अडचण नाही. आम्ही तातडीने परवानगीही देत आहोत. जास्तीत जास्त उद्योग सुरू व्हावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- महेशकुमार मेघमाळे, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी, लातूर


लॉकडाउनच्या काळात उद्योगांची स्थिती
----------------
जिल्हा-------एमआयडीसी हद्द, बाहेरील एकूण कारखाने-----सुरू झालेले कारखाने-----------बंद असलेले कारखाने

औरंगाबाद-------५,३३७----------------------------९४०-------------------४,३९७
जालना--------१,५७४-----------------------------७८---------------------१,४९६
बीड---------१,०६४-------------------------------१३७---------------९२७
लातूर----------४,३५६------------------------२७१------------------४,०८५
उस्मानाबाद---------१,५६४-------------------१०३---------------------१,४६१
नांदेड-----------३,५५३----------------------९५------------------------३,४५८
परभणी-----------१,८८२--------------------३५-------------------------१,८४७
हिंगोली--------१,०५८----------------------२९----------------------------१,०२९


----------------------------------------------------------------------------------
एकूण--------२०,३८८-------------------१,६८८-------------------------१८,७००
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com