संविधानाला बळकटी देणाऱ्या युवा पिढीस पोलिसांचे बळ

प्रल्हाद कांबळे
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

आधुनिक पोलिस चौकीच्या माध्यमातून संरक्षण व बळकटी मिळणार असल्याचे प्रतिपादन नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी व्यक्त केले. 

नांदेड : देशाच्या संविधानाला युवा पिढीमुळे बळकटी मिळते. या युवा पिढीला आता नव्याने सुरू झालेल्या आधुनिक पोलिस चौकीच्या माध्यमातून संरक्षण व बळकटी मिळणार असल्याचे प्रतिपादन नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी व्यक्त केले. 

आयआयबी व जिल्हा पोलिस दलाच्या वतीने मंगळवारी (ता. २६) संविधान दिनानिमित्त शामनगर येथील कस्तुरबा गांधी महिला रुग्णालय परिसरात पोलिस चौकी व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पण सोहळ्यात श्री. लोहिया बोलत होते. यावेळी पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधिक्षक दत्ताराम राठोड, आयआयबीचे व्यवस्थापकीय संचालक दशरथ पाटील, भार्गव करीअर अकॅडमीचे संचालक भार्गव राजे, संचालक डॉ. महेश पाटील, नरेश भोसले, उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) अभिजीत फस्के, इतवारा उपविभागाचे डीवायएसपी धनंजय पाटील, नगरसेविका जयश्री पावडे, अपर्ना नेरलकर, महेंद्र पिंंपळे, निलेश पावडे, रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. भारत संगेवार आदींची उपस्थिती होती. 

युवा पिढीसोबत नांदेड पोलिस 

पुढे बोलताना श्री. लोहिया म्हणाले की, आज संविधान दिवस असून त्या संविधानाच्या बळकटीकरणासाठी युवा पिढीवर महत्वाची जबाबदारी आहे. मात्र या युवा पिढीला गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठी व त्यांच्या सुरक्षेसाठी नांदेड पोलिस सदैव तत्पर आहे. पोलिस चौकीमुळे सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनींना आता सुरक्षेची बळकटी मिळणार आहे. या पोलिस चौकीकडे मी स्वत: वैयक्तीक लक्ष ठेवणार आहे. अशा संवेदनशिल परिसरात सीसीटीव्ही सुरू करून खऱ्या अर्थाने आयआयबीने समाजकार्य केले त्यांच्या या कार्याचा त्यांनी कौतूक केले. हा परिसरच नव्हे तर नांदेड जिल्हा हा गुन्हे मुक्त करण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज असल्याचे श्री. लोहिया म्हणाले. पोलिस चौकी व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे उद्घाटन झाल्याचे त्यांनी जाहिर केले.

छेड काढणाऱ्यांची गय नाही

पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर यांनीही विद्यार्थ्यांना पोलिस चौकीचे महत्व पटवून दिले. शहरात विविध भागात २५ पोलिस चौक्या सुरु केल्याने गुन्हेगारीवर नियंत्रण मिळाले आहे. खासगी शिकवणी परिसरात विद्यार्थीनींची छेड काढणारांना पोलिस कधीच पाठीशी घालणार नाही. या सुरू झालेल्या आधुनिक पोलिस चौकीच्या पुढे माझा, अतिरिक्त एसपी आणि डीवायएसपी यांचा थेट संपर्क क्रमांक देणार आहोत. चौकी बंद असल्यास आम्हाला थेट संपर्क करा असे आवाहनही त्यांनी केले. 

आयआयबी शिक्षण व सामाजीक क्षेत्रात अव्वल

यावेळी प्रास्ताविकात डॉ. महेश पाटील यांनी आयआयबीच्या शैक्षणिक उपक्रमांचा व सामाजीक दायीत्वाचा आढावा सांगितला. देशाच्या सिमेवर लढणारे सैनिक, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटंबातील विद्यार्थी यांना मोफत तर पोलिसांच्या पाल्याना अर्ध्या फिसमध्ये प्रवेश दिला जातो. स्वखर्चातून या परिसरात ५२ सीसीटीव्ही कॅमेरे व पोलिस चौकीचा पूर्ण खर्च केल्याचे त्यांनी सांगितले. या चौकीमुळे या भागातील टवाळखोरांवर लगाम लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी पोलिस उपाधिक्षक (मुख्यालय) आसाराम जहारवाल, पोलिस निरीक्षक संजय ननवरे, अनिरूध्द काकडे, एपीआय विनोद चव्हाण यांच्यासह आयआयबीचे सर्व शिक्षक, पीटीएचे पदाधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Strengthening of the Constitution: The Strength of the Police