बंदोबस्ताचा ताण तरीही पोलिसांचा कारवाईवर भर, कुठे ते वाचा...

karvai
karvai

हिंगोली ः जिल्ह्यात मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या ‘कोरोना’च्या बंदोबस्तात वेगवेगळ्या ठिकाणी होत असलेल्या कारवाईसुध्दा महत्वपुर्ण आहेत. बंदोबस्ताचा ताण तरीही अवैध धंदे बंद करणे, कारवाईतून माल पकडणे अशी कामे करण्यासाठी पोलिसांची धडपड सुरूच आहे. रविवारी, सोमवारी एक लाख १६ हजारांचा गुटखा, ३४ हजारांची हातभट्टी दारू तसेच पाच ठिकाणी अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. 

पिंपरी बुद्रुक येथे एक लाख १६ हजारांचा गुटखा पकडला
आखाडा बाळापुर ः पिंपरी बुद्रुक येथे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी एक लाख १६ हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला असून याप्रकरणी तिघांवर सोमवारी (ता.२०) गुन्हा दाखल झाला आहे. बाळापुर पोलिस ठाणे अंतर्गत पिंपरी बुद्रुक येथे संजय दिगंबर जाधव यांच्या एका टीन पत्राच्या खोलीमध्ये गुटखा असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मिळाली. त्यावरून अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी अनुराधा भोसले यांच्या पथकाने पिंपरी बुद्रुक येथे जाऊन छापा टाकला. यामध्ये एक लाख १६ हजार रुपये किमतीचा गुटखा असल्याचे आढळून आले. सदरील गुटखा हदगाव येथील मुसा पटेल व अर्धापूर येथील फसी उर्फ फसूभाई यांच्याकडून आणल्याचे माहिती झाले. याप्रकरणी श्रीमती भोसले यांच्या तक्रारीवरून वरील तिघांवर बाळापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सहायक पोलिस उपनिरीक्षक आर. बी. पोटे तपास करीत आहेत.

मास्‍क न बांधणारे, सोशल डिस्‍टन्स न पाळणाऱ्यांवर कारवाई
सेनगाव ः येथील नगर पंचायतीचे मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध गैरकृत्य करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कारवाईला सुरवात केली आहे. मास्क न वापरणे व सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्या २० जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई सोमवारी (ता. २०) करण्यात आली. आदेशाचे तंतोतंत पालन नागरिक व दुकानदारांनी करण्यासाठी मुख्याधिकारी शैलेश फडसे व कर्मचारी अविनाश जाधव, अंकुश जाधव, जगन दिनकर, सुनील देशमुख, विशाल बीडकर हे रस्त्यावर उतरले होते. या पथकाकडून सोशल डिस्टन्स न पाळणे व तोंडाला मास्क न वापरणाऱ्या २० व्यक्तींविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. यात एकूण पाच हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, मंगळवारपासून (ता. २१) नगर पंचायत प्रशासनाकडून विनाकारण वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. 

सवना तांडा येथील हातभट्टीवर पोलिसांची धाड
हिंगोली ः सेनगाव तालुक्‍यातील गोरेगाव पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सवना तांडा येथे हातभट्टीची दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून रविवारी (ता. १९) येथे धाड टाकून गावठी दारू व सडके रसायनाचे साहित्य, असे ३४ हजारांचे साहित्य नष्ट करण्यात आले आहे. सवना तांडा येथे हातभट्टीची दारू सुरू असल्याची माहिती गोरेगाव पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली काशिनाथ शिंदे, विजय कालवे, श्री. कदम, विजय महाले यांच्या पथकाने रविवारी सायंकाळी धाड टाकली असता हातभट्टीचे सहाशे ८० रुपयांचे रसायन व व गावळी दारू, असे एकूण ३४ हजार रुपये किमतीचे रसायन नष्ट करण्यात आले. या बाबत सुधाकर राठोड, अंबादास आडे, चरणदास आडे, विठ्ठल राठोड, बालाजी जाधव, प्रकाश जाधव, उल्हास चव्हाण यांच्या विरोधात पोलिस कर्मचारी साहेबराव राठोड यांच्या फिर्यादीवरून गोरेगाव पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

पाच ठिकाणी ४६ हजारांचा दारू साठा जप्त
हिंगोली ः स्‍थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाच ठिकाणी छापे मारून ४६ हजार रुपये किमतीचा गावठी दारूचा साठा रविवारी (ता.१९) जप्त करून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत लिंबाळा मक्‍ता येथे तीन ठिकाणी, तर हिंगोली शहरातील बावनखोली व आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत एका ठिकाणी बारा हजारांचा दारू साठा जप्त केला आहे, तर अन्य दोघांकडून ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्‍यांच्याकडून गावठी दारू व त्‍यासाठी लागणारे सडके रसायन नष्ट केले आहे. शहरातील बावनखोली भागात पोलिसांनी छापा टाकून दशरथ चव्हाण याच्याकडून दोन हजारांचा मुद्देमाल जप्त केला करून गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपींकडून ४५ हजारांचा अवैध दारूसाठा पोलिसांच्या पथकाने पकडला आहे. तसेच बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भाटेगाव शिवारात पोलिसांनी छापा मारून श्‍यामराव राठोड यांच्याकडून एक हजार नऊशे रुपयांचा दारू साठा जप्त करून तो नष्ट केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com