Bharat Bandh Updates : परभणीत शेतकरी कायदा विरोधात जिल्ह्यात कडकडीत बंद

​गणेश पांडे 
Tuesday, 8 December 2020

परभणी शहरात सकाळपासूनच बंदचा परिणाम दिसून आला. भाजीपाला, दूध विक्रेत्यांनी शहराकडे पाठ फिरवली.

परभणी : केंद्र सरकारने पारित केलेला शेतकरी कायदा हा शेतकऱ्यांच्या विरोधातील असून तो रद्द करावा, या मागणीसाठी मंगळवारी (ता.०८) संपूर्ण जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला होता. या बंदला जिल्हा भरात प्रतिसाद मिळाला.

परभणी शहरात सकाळपासूनच बंदचा परिणाम दिसून आला. भाजीपाला, दूध विक्रेत्यांनी शहराकडे पाठ फिरवली. वसमत रस्त्यावरील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या गेटसमोर बसणाऱ्या शेतकऱ्यांनीही मंगळवारी बंदच्या पार्श्वभूमीवर भाजीपाला विक्री बंद होती. मंगळवारी शेतकरी कायद्याविरोधात पुकारलेल्या भारत बंदमुळे एकही शेतकरी इकडे फिरकला नाही. त्यामुळे येथे मोठा शुकशुकाट दिसून आला. गांधीपार्क, क्रांतीचौक व जिंतूर रस्त्यावर ही भाजी व फळ विक्रेते आढळले नाहीत. सकाळी ११ वाजता वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा प्रमुख डॉ. धर्मराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उड्डाण पुलावर रस्तारोको करण्यात आला. 

हे ही वाचा : Bharat Bandh Updates : हिंगोलीत भारत बंदला मोठा प्रतिसाद

यावेळी तब्बल अर्धा ते पाऊन तास हा रस्ता रोको चालला. यावेळी उड्डाण पुलावर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिवाजी चौक परिसरात सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते तथा माजी महापौर प्रताप देशमुख, कॉग्रेसेचे नेते तथा उपमहापौर भगवानराव वाघमारे, स्वराजसिंह परिहार, नदीम इनामदार, कामगार नेते राजन क्षीरसागर, बाळासाहेब देशमुख, अॅड. माधुरी क्षीरसागर यांचा सहभाग होता. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणा देत मुंडण आंदोलन केले.

हे ही वाचा : हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील वीज देयकासाठी २१.३१ लाखाचा निधी 

सेलू शहरात कडकडीत बंद

सेलू : शहरातील विविध संघटना, राजकीय पक्षाचे  पदाधिकारी या बंद मध्ये सहभागी झाले होते. यावेळी शहरातील मुख्य रस्त्यावरून फेरी काढून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. किसान सभा, आयटक, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने शहरातून मोटार सायकल रॅली काढून घोषणा दिल्या. मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत शेतकरी विरोधी कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी शहरातील क्रांती चौकात केंद्र सरकारने पारित केलेल्या कायद्याची होळी करण्यात आली. 

यावेळी हेमंतराव आडळकर, अशोक काकडे, डॉ. संजय रोडगे,  मिलिंद सावंत, पवन आडळकर, रामकृष्ण शेरे, कॉ. रामेश्वर पौळ, संदीप लहाने, विनोद तरटे, मनिष कदम, रघुनाथ बागल, रमेश डख, कॉ. उद्धव पौळ, दिलावरभाई आदींची उपस्थिती होती.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A strict shutdown has been declared in the district against the Parbhani Farmers Act