Bharat Bandh Updates : हिंगोलीत भारत बंदला मोठा प्रतिसाद

राजेश दारव्हेकर
Tuesday, 8 December 2020

दिल्ली येथे विविध राज्यांतील शेतकऱ्यांनी केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला पाठींबा म्हणून मंगळवारी भारत बंदची हाक देण्यात आली. जिल्ह्यात महाविकास आघाडीसह विविध पक्षांनी व संघटनांनी आंदोलनाला पाठींबा जाहीर केला आहे.

हिंगोली : केंद्र सरकारने पारित केलेला नवीन कृषी कायदा शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत दिल्ली येथे सुरु असलेल्या आंदोलनाला पाठींबा म्हणून मंगळवारी (ता. आठ)  पुकारलेल्या भारत बंदला जिल्ह्यात प्रतिसाद मिळाला आहे. शहरातील सर्व प्रतिष्ठाने व भाजीमंडई कडकडीत बंद ठेऊन व्यापारी  सहभागी झाले होते.

दिल्ली येथे विविध राज्यांतील शेतकऱ्यांनी केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला पाठींबा म्हणून मंगळवारी भारत बंदची हाक देण्यात आली. जिल्ह्यात महाविकास आघाडीसह विविध पक्षांनी व संघटनांनी आंदोलनाला पाठींबा जाहीर केला आहे. सकाळी बाहेर जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या बस बसस्थानकातून बाहेर निघाल्याच नाहीत. हिंगोलीत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी बंदसाठी आवाहन केले होते. 

मराठवाड्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

या आवाहनाला व्यापाऱ्यांनी देखील प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील काही समित्यांमध्ये बंद पाळण्यात आला. दरम्यान शहरातील बाजारपेठ देखील कडकडीत बंद होती. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. यामुळे शहरातील महाविकास आघाडीच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते.  

दरम्यान महाविकास आघाडीच्या वतीने शहरातील गांधी चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या. मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व इतर पक्षाचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Bharat Bandh in Hingoli has received a huge response