दसरा सणाला शेख गुरुजींच्या भेटीला माजी विद्यार्थी 

अरुण ठोंबरे
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

नळणी (जि. जालना) : येथे दरवर्षी गुरुवंदनाचा उपक्रम 

केदारखेडा (जि. जालना) -  दसरा सणानिमित्त थोरमोठ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी सारेच सरसावत असतात. विशेष म्हणजे सेवानिवृत्त शिक्षक शेख शमसोद्दीन यांच्या भेटीसाठी दरवर्षी पंचक्रोशीतील माजी विद्यार्थी नळणी (ता. भोकरदन) येथे जातात. गुरुवंदनाचा कार्यक्रम होतो. ज्या शिक्षकाने आयुष्य घडविले त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्‍त करण्याचा हा सोहळा हृदयस्पर्शी असाच आहे. 

नळणी येथे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेत अध्यापनाचे कार्य केलेले शेख शमसोद्दीन हे विद्यार्थीप्रिय शिक्षक. त्यांच्यामुळे अनेकांना हिंदी विषयाची गोडी लागली. अनेकांना वेळोवेळी मार्गदर्शनासाठी ते तत्पर. कुणाची फीस नसेल तर ती भरणे, अडचणीत मार्गदर्शन करणे अशा अनेक बाबींमुळे विद्यार्थी आणि शेख सर यांच्यातील ऋणानुबंध घट्ट होत गेले. अनेक विद्यार्थी शिकून विविध ठिकाणी गेले. नोकरी, व्यवसाय, शेतीत रमले. शेख सरही जवळपास दोन दशकांपूर्वी सेवानिवृत्त झाले; पण गुरुजींचा विसर मात्र कुणीही पडू दिलेला नाही. शेख सर आता औरंगाबादला वास्तव्याला आहेत, अधूनमधून नळणीला ते येत असतात. दसरा सणाला तर त्यांना यावेच लागले. कारण दरवर्षी दसरा सण येताच अनेक माजी विद्यार्थी शेख सरांच्या भेटीसाठी येत असतात. अर्थात, शेख सरांनाही हे माहिती असल्याने ते आपल्या लाडक्‍या विद्यार्थ्यांसाठी गोडधोडही बनवून तयार असतात. केदारखेडा, पळसखेडा, जवखेडा अशा पंचक्रोशीतील विविध गावांमध्ये शेख सरांचे विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांच्या गराड्यात त्यांचा दिवस जातो. दरम्यान, मंगळवारी (ता. आठ) शेख सर माजी विद्यार्थी गणेश ठोंबरे, संजय ठोंबरे, रावसाहेब ठोंबरे, विजय ठोंबरे, सांडू ठोंबरे, पुंजाराम ठोंबरे अशा अनेकांनी त्यांची भेट घेतली. शुभेच्छा देत गुरुवंदनही केले. 

मी नळणीला दसऱ्याला आलो की माझे विद्यार्थी धावत येतात. हे प्रेम जगात पैशाने मिळणार नाही. हा सन्मान मला मोलाचा वाटतो. आपल्या विद्यार्थ्यांनी खूप प्रगती करावी हीच शिक्षकाची मनोकामना असते आणि त्यांची प्रगती हीच गुरुदक्षिणा. 
शेख शमसोद्दीन, 
सेवानिवृत्त शिक्षक, नळणी 
------ 
शेख सरांनी आमच्या आयुष्याला दिशा दिली. संपत्ती कमाविता आली नाही तरी चालेल; पण विवेक, प्रमाणिकपणा कमवावा. ज्येष्ठांचा आदर आणि नम्रता हीच आयुष्यातील यशाची गुरुकिल्ली अशी शिकवण आम्हाला दिली. या शिकवणीचे संचित घेऊन आयुष्यात वाटचाल करीत आहोत. 
गणेश ठोंबरे, 
माजी विद्यार्थी, जवखेडा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: students meet teacher