घरातील पोषक वातावरणाने मिळाले यश, कुणालचा युपीएससीत झेंडा...

गणेश पांडे 
Tuesday, 4 August 2020

केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा २०१९ चा निकाल आज मंगळवारी जाहीर केला आहे. या परीक्षेत परभणीतील कुणाल मोतीराम चव्हाण यांनी यूपीएससी परीक्षेत ऑल इंडिया रँकमध्ये २११ वे स्थान पटकावून बाजी मारली आहे.

परभणी ः केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा २०१९ चा निकाल आज मंगळवारी जाहीर केला आहे. या परीक्षेत परभणीतील कुणाल मोतीराम चव्हाण यांनी यूपीएससी परीक्षेत ऑल इंडिया रँकमध्ये २११ वे स्थान पटकावून बाजी मारली आहे. 

परभणी शहरातील स्नेहशारदानगरातील रहिवासी कुणाल चव्हाण याचे बालवाडी ते दहावीपर्यंतचे शिक्षण गांधी विद्यालयात झाले. दहावीत मेरिटमध्ये आल्यानंतर अकरावी-बारावीचे शिक्षण लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयात झाले. बारावीतही तो मेरिटमध्ये आला. त्यानंतर पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली. पदवीला असल्यापासूनच त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती. मागील काही दिवसांपासून तो दिल्लीत यूपीएससीच्या तयारीसाठी गेला होता. आज जाहीर झालेल्या यूपीएससीच्या निकालात त्याने देशात २११ वा क्रमांक पटकाविला आहे. त्याचे वडील भूमी अभिलेख कार्यालयाचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. तर आई गृहिणी आहे. 

घरातील सर्वचजण उच्चशिक्षित
कुणाल चव्हाण हे सलग दहा ते बारा तास स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचे. घरात अभ्यासासाठी पोषक वातावरण असल्याने त्यांचा फायदाही आपल्या या परीक्षेतील यशासाठी झाला असे कुणाल चव्हाण यांनी सांगितले. कुणाल चव्हाण यांच्या घरातील सर्वचजण उच्चशिक्षित आहेत. त्यांची मोठी बहीण गृहिणी आहेत. तर दुसऱ्या बहिणी ज्योती चव्हाण या परभणी पोलिस दलामध्ये चांगल्या पदावर कार्यरत आहेत. तिसरी बहीण ही डॉक्टर आहेत. कुणाल चव्हाण हे कुटुंबात सर्वात छोटे असल्याने त्यांच्या अभ्यासाकडे सर्वांचेच लक्ष राहायचे असे त्यांची बहीण ज्योती चव्हाण यांनी सांगितले. 

हेही वाचा - तिसऱ्या प्रयत्नात अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा झळकला युपीएससीत

‘ईपीएफओ’मध्ये झाली होती निवड 
कुणाल चव्हाण यांची या आधी ईपीएफओ हैदराबाद येथे जानेवारी २०२० मध्ये निवड झाली होती. ते या ठिकाणी अकाउंट ऑफिसर या पदावर कार्यरत होते; परंतु मार्चमध्ये त्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले. त्यात त्यांची निवड झाली आहे. 

हेही वाचा - सोयाबीन​ किडीचा प्रादुर्भाव झालाय, काळजी करु नका...

अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा झळकला युपीएससीत
हिंगोली ः वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील शेतकऱ्याचा मुलगा सुरेश शिंदे याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले आहे. त्याने देशात ५७४ वा क्रमांक मिळविला आहे. मुलगा अधिकारी झाल्याचा आनंद आई - वडिलांना झाला आहे. सुरेश कैलासराव शिंदे यांचे शिक्षण पांगरा शिंदे येथील प्राथमिक शाळेत झाले. इयत्ता सातवीपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण झाल्यानंतर आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण रोकडेश्वर विद्यालय पांगरा शिंदे येथे झाले. त्यानंतर त्यांनी नांदेडच्या यशवंत महाविद्यालयात प्रवेश घेतला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न त्यांनी बाळगले. त्यादृष्टीने त्यांनी तयारीही सुरू केली. सन २०१२ मध्ये बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी नांदेडच्या श्री गुरू गोविंदसिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचा अभ्यासक्रम २०१५ साली पूर्ण केला. या अभ्यासक्रमात ८२ टक्के गुण मिळविले. 

संपादन ः राजन मंगरुळकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Success due to nutritious environment at home, Kunal's flag with UPSC, parbhani news