अपयशातूनच शोधला यशाचा मार्ग, झाला पोलिस उपअधीक्षक

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 June 2020

अजय हा येथील योगेश्वरी नूतन विद्यालयाचा विद्यार्थी आहे. दहावीनंतर त्याने लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयात १२ विज्ञान शाखेत शिक्षण घेतले.

अंबाजोगाई (जि. बीड) - येथील अजय विलासराव कोकाटे याने अपयशातूनच यशाचा मार्ग शोधत पोलिस उपअधीक्षकपदी झेप घेतली. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्याने राज्यातून २५ वी, तर पोलिस उपअधीक्षक पदातून तिसरी रॅंक मिळविली आहे. मागील दोन वर्षे या परीक्षा देत अजयने ठरविलेल्या ध्येयापर्यंत पोचण्याचा मार्ग शोधला.

अजय हा येथील योगेश्वरी नूतन विद्यालयाचा विद्यार्थी आहे. दहावीनंतर त्याने लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयात १२ विज्ञान शाखेत शिक्षण घेतले. २०१४ मध्ये तो सांगलीच्या वालचंदनगर अभियांत्रिकी महाविद्यालयात बी.टेक. ही अभियांत्रिकीची पदवी घेऊन पुण्यात ‘यूपीएससी’च्या तयारीला लागला. चार वर्षे तो आयएएस व आयपीएस पदासाठी परीक्षा देत होता; परंतु त्यात यश न आल्याने, पोलिस उपअधीक्षकपदासाठी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा तो देऊ लागला. प्रारंभी त्यातही अपयश आले; परंतु या अपयशाने खचून न जाता त्याने प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर शुक्रवारी (ता. १९) जाहीर झालेल्या आयोगाच्या परीक्षेत त्याने पोलिस उपअधीक्षकपदासाठी तिसरी रॅंक मिळविली. 
 
दहा तास अभ्यासाचे फळ 
आई, वडिलांचे पाठबळ आणि मित्रांचे सहकार्य व प्रोत्साहनामुळे अजयने अभ्यासात खंड न पडू देता परीक्षा देणे सुरूच ठेवले होते. दिवसातले दहा तास तो अभ्यास करीत होता. या कष्टाचे फळ मिळाल्याचे तो सांगतो. पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीचे वेळोवेळी मिळालेले मोलाचे मार्गदर्शन आणि मित्रांच्या सहकार्यामुळे यश प्राप्त झाल्याचे अजयने सांगितले. आई-वडिलांचे पाठबळ अजयचे मूळ गाव हावरगाव (ता. कळंब, जि. उस्मानाबाद) हे आहे. त्याचे वडील विलास कोकाटे येथील न्यायालयात वरिष्ठ लिपिक असल्याने अजयची जन्मभूमी व शैक्षणिक कर्मभूमी अंबाजोगाईच राहिली आहे. त्याचा दुसरा भाऊ अमरने बी.एस्सी. अॅग्रीच्या अंतिम वर्षाची परीक्षा दिली आहे. आई गृहिणी आहे. आई-वडिलांनी शिक्षणासाठी कधीच अडचण येऊ दिली नाही. त्यांच्या पाठबळामुळेच अपयशाने खचलो नसल्याचे त्याने सांगितले.

क्रेडिट कार्डच्या विळख्यात अडकले आहात ? अशी करा क्रेडिट कार्डच्या विख्यातून स्वतःची सुटका...
 
योगेश रांजणकरही झाला पोलिस उपअधीक्षक 
अंबाजोगाई येथील अभियंता योगेश चंद्रकांत रांजणकर याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पाहिल्या प्रयत्नात यशाला गवसणी घातली. त्याची पोलिस उपअधीक्षक म्हणून निवड करण्यात आली.  येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील व्यापारी चंद्रकांत रांजणकर यांचा मुलगा योगेश याने लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलिस उपअधीक्षक पदाच्या परीक्षेत यश संपादन केले.

योगेशचे शालेय शिक्षण योगेश्वरी नूतन विद्यालयात झाले. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण लातूरला झाले. पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्याने मेकॅनिकल शाखेत पदवी संपादन केली. त्यानंतर आदित्य बिर्ला ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजमध्ये एक वर्ष नोकरी केली. अंबाजोगाईला येऊन कोठेही शिकवणी न लावता त्याने लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. पोलिस उपअधीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या लेखी व तोंडी परीक्षेत त्याने यश संपादन केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Success story Ajay Kokate and Yogesh Ranjankar beed News