esakal | चोरट्यांची अशीही शक्कल...कोणती ते वाचा  

बोलून बातमी शोधा

File photo}

देशभरात कांदा दरवाढीवरून रणकंदन माजले असताना गोडेतेलाच्या किमतीतही वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्यांच्या फोडणीतून तेल गायब होण्याच्या मार्गावर आहे. किमती वाढल्याने चोरटेही आता किराणा दुकानांतील साहित्य पळविण्यावर भर देत आहेत.  

चोरट्यांची अशीही शक्कल...कोणती ते वाचा  
sakal_logo
By
विनायक हेंद्रे

आखाडा बाळापूर(जि. हिंगोली):  आखाडा बाळापूर (ता.कळमनुरी) येथील किराणा दुकानासमोर ठेवलेले ४८ हजार रुपये किमतीचे सोयाबीन गोडतेल असलेल्‍या तीन टाक्‍या चोरट्यांनी पळविल्‍याची घटना घडली असून या प्रकरणी रविवारी (ता. १५) आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाला आहे. दरम्यान, कांद्यापाठोपाठ तेलाने शंभरी गाठली आहे. त्यामुळे चोरट्यांनी शक्कल लढवत आपला मोर्चा दैनंदिन वापराच्या वस्तूंवर वळविला आहे. त्यामुळे किराणा व्यापाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आखाडा बाळापूर येथे संतोष लक्ष्मणराव चक्रवार यांचे संतोष किराणा स्‍टोअर्स हे दुकान आहे. त्‍यांनी त्‍यांच्‍या दुकानासमोर गोडतेलाने भरलेल्‍या तीन टाक्‍या ठेवल्‍या होत्‍या. प्रत्‍येकी टाकीमध्ये दोनशे लिटर गोडतेल होते. शनिवारी (ता.१४) रात्री चोरट्यांनी गोडतेलाच्‍या तिन्‍ही टाक्‍या पळविल्‍या. या गोडतेलाची किंमत ४८ हजार सहाशे रुपये एवढी होती. हा प्रकार रविवारी (ता. १५) सकाळी श्री. चक्रवार यांना लक्षात आला. त्‍यानंतर या प्रकरणी श्री. चक्रवार यांनी दिलेल्‍या तक्रारीवरून आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाला आहे. पोलिस कर्मचारी श्री. बाभळे हे पुढील तपास करीत आहेत.

हे तुम्ही वाचाच - काय आहे बंजारा हस्तशिल्प कला..? जाणून घ्या..

चोरट्यांचा किराणा दुकानांकडे मोर्चा
दरम्यान, आखाडा बाळापूर बाजारपेठ किराणा व्यापारासाठी ओळखली जाते. त्यामुळे परिसरातील ३० ते ३५ गावांतील ग्रामस्थ खरेदीसाठी बाळापूरला पसंती देतात. त्यामुळे दिवसभर वर्दळ असते. येथे आतापर्यंत अनेक चोरीच्या घटना घडल्या आहेत. मात्र, चोरट्यांचा मोर्चा सोने, चांदी दुकानांकडे होता. किराणा दुकान फोडले तरी गल्ल्यातील पैसे तेवढे पळविले जात होते. आता खाद्यतेलाच्या किमतीही वाढल्या आहेत. गोडेतेलानेही शंभरी गाठली आहे. त्यामुळे चोरट्यांनी आपला मोर्चा किराणा दुकानांकडे वळविला आहे.

तेल पोचले शंभर रुपये किलोवर
दरम्यान, दिवाळीनंतर तेलात दरवर्षी थोड्या अधिक प्रमाणात भाव वाढ होत असते. मात्र, ही वाढ जुजबी असते. या वेळी मात्र दिवाळीपासून एक किलो तेलात पंधरा रुपयांनी वाढ झाली आहे. दिवाळीला ८० ते ८२ रुपये प्रतिकिलो असणारे तेल आता शंभर रुपयांवर विक्री होत आहे. एका महिन्यातच एवढी मोठी वाढ प्रथमच झाली आहे. महिनाभरापूर्वी किरकोळ बाजारात ८० ते ८२ रुपये दराने विकले जाणारे सोयाबीन तेल ९५ ते १०२ रुपयांपर्यंत विकले जात आहे. तसेच ६८ ते ७० रुपये विक्री होणारे पामतेल ८५ ते ९० रुपयांपर्यंत पोचले आहे.

हे वाचा पैशावरूनच झाला विद्यार्थ्याचा खून

परतीच्या पावसाने सोयाबीनचे नुकसान
बाजारात हॉटेलचालक, छोटे व्यावसायिक हे पामतेल वापरतात. घरी वापरण्यासाठी नागरिक सोयाबीन तेलाला पसंती देतात. हिवाळ्यात थंडीमुळे पामतेल थिजत असल्याने सोयाबीन तेलाची मागणी असते. त्‍याचा परिणाम सोयाबीन तेलाच्या भाववाढीवर झाला आहे. सरकी तेल बाजारात आल्यानंतर भाव स्‍थिर राहतात. या वेळी मात्र, परतीच्या पावसाने सोयाबीनचे झालेले नुकसान, सरकारने आयात तेलावरील ड्युतीत केलेली वाढ व मलेशिया सरकारने इंधन म्‍हणून २० ऐवजी ३० टक्‍के पामतेल वापरास दिलेल्या परवानगीमुळे भाववाढ तेजीत झाली आहे.