जामिनावर सुटताच थाटले गर्भपाताचे दुकान, परळीमध्ये सुदाम मुंडेवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 September 2020

गर्भलिंगनिदान, अवैध गर्भपात प्रकरणात शिक्षा झालेला, वैद्यकीय पदवी निलंबित झालेली असतानाही सुदाम मुंडे याने जामिनावर असताना दवाखाना थाटून वैद्यकीय व्यवसाय सुरू केल्याचे निदर्शनास येताच यंत्रणेने कारवाईचा बडगा उचलला.

परळी वैजनाथ (जि.बीड) : गर्भलिंगनिदान, अवैध गर्भपात प्रकरणात शिक्षा झालेला, वैद्यकीय पदवी निलंबित झालेली असतानाही सुदाम मुंडे याने जामिनावर असताना दवाखाना थाटून वैद्यकीय व्यवसाय सुरू केल्याचे निदर्शनास येताच यंत्रणेने कारवाईचा बडगा उचलला. महसूल, पोलिस व आरोग्य विभागातील नऊजणांच्या पथकाने शनिवारी (ता. पाच) रात्री शहरातील नंदागौळ रस्त्यावरील त्याच्या दवाखान्यावर कारवाई करून त्याला अटक केली.

पाणीपुरवठा योजनेची संचिका मंत्रालयात पडून, अर्थविभागाच्या मान्यतेची प्रतीक्षा

कारवाईदरम्यान मुंडेने पथकाशी अरेरावी केली. अरेरावी, फसवणुकीसह आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असतानाही विनापरवाना रुग्ण दाखल करून घेतल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला. धर्मापुरी (ता. परळी) आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी बालासाहेब मैडे यांनी तशी फिर्याद दिली.

बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात बोगस डॉक्टर तपासणी मोहीम राबविण्यात आली. तीत शहरापासून जवळ नंदागौळ रस्त्यावरील रामनगर परिसरात सुदाम मुंडेने दवाखाना थाटून रुग्णांची तपासणी सुरू केल्याचा प्रकार समोर आला. उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक, तहसीलदार विपिन पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, वैद्यकीय अधिकारी ज्ञानोबा मुंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण मोरे, डॉ. दिनेश कुरमे, नायब तहसीलदार बाबूराव रूपनर, पोलिस निरीक्षक हेमंत कदम, पोलिस निरीक्षक बी. एन. पवार आदींनी संयुक्तरीत्या त्याच्या दवाखान्यावर छापा टाकला. वैद्यकीय पदवी निलंबित असताना मुंडेने एक वर्षापासून खासगी दवाखाना, नर्सिंग, वैद्यकीय व्यवसाय सुरू केला होता, असे तपासणीत आढळले.

औरंगाबादेत कोरोना रुग्णांसाठी आयसीयू बेड शोधत फिरण्याची वेळ; रुग्णवाहिका,...  

पथकाशी अरेरावी, दमदाटी
कारवाईसाठी गेलेल्या पथकातील काही सदस्यांशी सुदाम मुंडे याने अरेरावी, दमदाटी, शिवीगाळ केली. थोबाडीत मारीन, असेही सुनावले. त्यामुळे त्याच्याविरुद्ध विविध गुन्ह्यांची नोंद करीत शहर पोलिसांनी त्याला अटक केली.

चार दिवसांची कोठडी
सुदाम मुंडेला रविवारी (ता. सहा) तालुका न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्यानंतर त्याला शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले.

(संपादन - गणेश पिटेकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sudam Munde Arrested In Parli Beed News