esakal | अन् पुरासोबत शेतकऱ्यांचे स्वप्न वाहून गेले
sakal

बोलून बातमी शोधा

kannad

अन् पुरासोबत शेतकऱ्यांचे स्वप्न वाहून गेले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागद : परिसरात खरिपातील पिके जोमात होती. आता आपल्याला चांगले उत्पन्न मिळेल, असे स्वप्न येथेल शेतकरी रंगवीत होते. मात्र, भिलधरी येथे दोन पाझर तलाव फुटल्याने गडदगड नदीला आलेल्या महापुरात नागद, सायगव्हाण, भिलधरी, वडगाव, हरसवाडी या पाच गावांतील पिके क्षणात होत्याचे नव्हते झाल्याने शेतकऱ्यांचे चांगल्या उत्पन्नाचे स्वप्न पाण्यात वाहून गेल्याने बळिराजा हताश झाला असून शेतींसह दुकान, घरांचेही नुकसान झाल्याने पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. (Aurangabad News)

नागद, सायगव्हाण, भिलधरी, वडगाव, हरसवाडीत नुकसान

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी रात्री तसेच पहाटे परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे भिलधरी येथे दोन पाझर तलाव फुटल्याने गडदगड नदीला आलेल्या पुरात भिलधरी, सायगव्हाण, वडगाव, हरसवाडी तसेच नागद येथील शेतीतील पिके पाण्यासोबत वाहून गेले आहे. तसेच येथील घरांचीही मोठी पडझड झाली असून गडदगड नदीच्या काठावर असलेल्या दुकानांत पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. येथील पुर ओसरल्यानंतर बुधवारी भिलधरी, सायगव्हाण, वडगाव व नागद येथील अनेक शेतकऱ्यांच्या गायी, म्हशी, बकऱ्या व शेती उपयोगी साहित्य पाइप, ठिबक संच तसेच विहीर जमीनदोस्त झाल्या.

हेही वाचा: दौलताबाद किल्ल्याच्या आवारात स्थानिकांचे अतिक्रमण

पंचनामे करण्याची नागरिकांची मागणी

नागद येथील गडदगड नदीच्या काठावर असलेल्या नागद ते बनोटी रस्त्यावर असलेल्या अनेक दुकाने मालासह वाहून गेल्याने दुकानदार क्षणात रस्त्यावर आले आहे. येथील शेकडे हेक्टर क्षेत्रावारील पिके वाहून गेली असून घरे तसेच दुकानांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने प्रशासनाने दखल घेऊन त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी तसेच ग्रामस्थांनी केली आहे. दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे. विद्युत पोल कोसळले, वृक्ष उन्मळून पडले भिलधरी येथे दोन पाझर तलाव फुटल्याने गडदगड नदीला आलेल्या महापुरात नागद, सायगव्हाण, भिलधरी, वडगाव, हरसवाडी या पाच गाव परिसरातील अनेक विद्युत पोल कोसळल्याने पुरवठा विस्कळित झाला होता.

हेही वाचा: औरंगाबादेत वीजबिल वसुली जोरात

मंत्री अब्दुल सत्तार यांची भेट

नागद जवळील भिलधरी येथील दोन पाझर तलाव फुटून भिलधरी, सायगव्हाण, वडगाव, हरसवाडी व नागद येथे मोठे नुकसान झाल्याने बुधवारी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार उदयसिंग राजपूत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी येथे भेट देऊन पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी केतन काजे, पांडुरंग घुगे, एसडीएम जनार्दन विधाते, तहसीलदार संजय वारकड, पोलिस निरीक्षक बालक कोळी,, साहेब, बाळराजे मुळीक, सरपंच राजधर आहिरे, उपसरपंच गीताबाई महाजन, नामदेव गोठवल, रणजित पाटील, विकास कारभारी, नाना आहिरे, सुभाष महाजन, बबलू पाटील, सचिन जैन, हिरालाल राजपूत, विजय सूर्यवंशी, भाऊसाहेब आहिरे यांची उपस्थिती होती.

loading image
go to top