कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

प्रल्हाद कांबळे
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

नांदेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका तरूण शेतकऱ्याने स्वत: च्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना माळझरा (ता. हदगाव) शिवारात सोमवारी (ता. नऊ) डिसेंबर रोजी घडली. 

नांदेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका तरूण शेतकऱ्याने स्वत: च्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना माळझरा (ता. हदगाव) शिवारात सोमवारी (ता. नऊ) डिसेंबर रोजी घडली. 

हदगाव तालुक्यातील माळझरा येथील शेतकरी गजानन गंगाधर कारले (वय २२) यांच्या शेतात मागील काही वर्षापासून सतत नापिकी होत होती. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ यामुळे शेतीतील उत्पन्न घटले. त्यातच या वर्षी पुन्हा त्यांनी बँकेचे कर्ज काढून परत शेतात दुबार पेरणी केली. मात्र पुन्हा अतिवृष्टीमुळे हातचे पीक गेले. आता घरखर्च व बँकेचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत तो मागील काही दिवसांपासून राहत होता. यातुनच त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. शेवटी सोमवारी (ता. नऊ) सकाळी आपल्याच शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना दुपारी उघडकीस आली.

हेही वाचामाहूर गडावर श्री दत्तजन्म सोहळा

नातेवाईकांनी मनाठा पोलिसांना कळविले. घटनास्थळी मनाठा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र मुंडे, महसुलचे अधिकारी, गावकरी आणि नातेवाईकांसह आदीनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी पंचनामा केला. मृतदेह विहिरीबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. उत्तरीय तपासणीनंतर पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. या प्रकरणी गंगाधर रामराव कारले (वय ५०) यांच्या माहितीवरून मनाठा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस हवालदार श्री. पवार करीत आहेत. 

याला टच करा - ‘या’ छम...छमची पूर्वी नव्हती तक्रार

डॉक्टरलेन भागात घरफोडी 
४८ हजार रुपये लंपास 

नांदेड : शहराच्या डॉक्टरलेन परिसरात असलेल्या एका औषधी (मेडीकल) दुकानाचे शटर वाकवून अज्ञात चोरट्यांनी गल्ल्यातील ४८ हजार रुपये लंपास केले. ही घटना रविवार ते सोमवारी (ता. नऊ) रात्री घडली. 

डॉक्टर लेन परिसरात सरदार गुरमितसिंग अमरजीतसिंग टुटेजा (वय ४०) रा. कौठा यांचे औषधी दुकान आहे. त्यांनी आपली दुकान रविवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास बंद करून घरी गेले. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटर वाकवून दुकानात प्रवेश केला. गल्ल्यातील नगदी ४८ हजार रुपये लंपास केले. ही बाब सोमवारी (ता. नऊ) सकाळी दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर श्री. टुटेजा यांच्या लक्षात आली. त्यांनी लगेच वजिराबाद पोलिस ठाण्यात जावून दुकान फोडल्याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पहाणी केली. पंचनामा करून श्री. टुटेजा यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार श्री. पन्हाळकर करीत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suicide of a debt-ridden farmer