‘या’ छम...छमची पूर्वी नव्हती तक्रार

File photo
File photo

नांदेड : ‘छडी लागे छम छम, विद्या येई घम घम’ अशी एक म्हण पूर्वी प्रत्येकाच्या ओठावर होती. काही अंशी ही म्हण खरीही होती. कारण छडी मारणाऱ्या शिक्षकांबद्दल शंका व्यक्त करण्याची पूर्वी कोणाची हिंमत नव्हती. किंबहुना शिक्षकांनी एक छडी मारली, असे विद्यार्थ्याने घरात सांगितले तर ‘बरं झालं, आणखी एक मारायला हवी होती,’ अशीच प्रतिक्रिया पालकांकडून व्यक्त होत होती. कारण शिक्षक, त्यांची शिकवण्याची तळमळ याबद्दल आदरार्थीच भावना होती आणि या भावनेतूनच शिक्षकांचा हातातील छडीबद्दल कधी कोणाची तक्रार नव्हती.


अलिकडे शाळेतील वरिष्ठांशी किंवा कुटुंबातील राग, मानसिक तणावातून विद्यार्थांना शिक्षा देण्याचे प्रकार समोर येत आहेत. सोमवारी (ता.नऊ डिसेंबर २०१९) शहरातील एका इंग्रजी शाळेमध्ये एक प्रकार घडला. एका विद्यार्थ्याने गृहपाठ पूर्ण न केल्याने सर्व मुलांसमोर ‘तिला’ शिक्षा केली. तिने हा प्रकार घरी आई-वडिलांना सांगितल्याने मंगळवारी पालकांनी मुख्याध्यापकांना झाल्या प्रकाराचा जाब विचारला. तेव्हा मुख्याध्यापकांनी सदर शिक्षकाची बाजू घेत पालकांना उडउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे या पालकांनी आणखी ओळखीच्या चार-पाच पालकांना शाळेत बोलावून घेऊन झाला प्रकार सांगितला. तेव्हा चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्‍वासन शाळा प्रशासनाने दिले. यापुढे असे प्रकार होणारनाहीत, असे स्पष्टीकरणही या मुख्याध्यापकाने केले.

नैतिकतेची छडी झाली दुर्मिळ 
शिक्षकाने जरुर विद्यार्थ्यांना हलकी फुलकी शिक्षा करावी, अशी पालकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली; पण घरातला, संघटनेतला, संस्थेतला राग विद्यार्थ्यांवर शिक्षेच्या रुपातून व्यक्त करू नये, अशी अपेक्षाही पालकांनी व्यक्त केली. आपणही लहानपणी शाळेत शिक्षकांच्या छड्या खाल्ल्याची, अंगठे धरून उभे राहिल्याची, डस्टर तसेच काळ्या रुळाने उलट्या हातावर ठोका खाल्ल्याची शिक्षा अनुभवली आहे. त्यामुळेच आम्हाला नैतिकतेचे धडे मिळाले. परंतु, हल्ली कौटुंबिक तसेच अंतर्गत कलहामुळे नैतकतेची छडी दुर्मिळ झाल्याचे चित्र आहे.

शिक्षणासाठी छडी महत्त्वाचा घटक
शाळा म्हटले की शैक्षणिक साधनांबरोबरच छडी हा एक महत्त्वाचा घटक होता.  किंबहुना या छडीच्या भीतीने घरचा पाठ"करण्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये होती. शिक्षकांनी मारले तर घरात तक्रार करण्याची विद्यार्थ्यांतच धमक नव्हती. कारण घरातले पालक आपली नव्हे तर शिक्षकांचीच बाजू घेणार याची विद्यार्थ्याला खात्री होती. याला कारण होते ते मन लावून, तळमळीने शिकवणारे शिक्षक. आज मात्र हे सर्व चित्र बदलल्याने नैतिकतेची छडीच दिसेनासी झाली आहे.

अंतर्गत कलह कारणीभूत
बीएड, डीएडला देणगी, नोकरी लागताना देणगी असे पाच-सहा लाख रुपये खर्च करून काही मंडळी नोकरीस लागलेली आहे. काही संस्थांत कागदावर पगार पाच आकडी; प्रत्यक्षात हातात पगार चार आकडी आहे. शिकवण्याशिवाय इतर कामाचा त्यांच्यावर भार आहे. नोकरीतून कधी काहीही कारण सांगून काढून टाकतील ही भीती आहे आणि त्याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होतो. त्याचा राग विद्यार्थ्यांवर निघत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया पालकांनी दिल्या.


 
शिक्षकांचा राग कधीच आला नाही
शिक्षकांचा मार आम्हीदेखील खाल्ला आहे. पण त्या शिक्षकांचा कधी राग आला नाही. उलट त्यांनी छड्यामारून पाढे पाठ करून घेतल्याने माझे गणित चांगले झाले. पण आता माझ्या मुलाच्या शाळेतील शिक्षक वर्गात मोबाईलवर बोलत असतो. त्या शिक्षकाला विद्यार्थ्याला मारण्याचा अधिकार नाही. शिक्षा न देता शिक्षण देणाराच खरा शिक्षक. शिक्षकाचे काम शिकवण्याचे आहे. त्याने शिकवलेले विद्यार्थ्याला समजले नाही तर तो विद्यार्थी कच्चा नव्हे तर शिक्षकाची कार्यक्षमता कमी असते. शिक्षकांवर शैक्षणिक कामापेक्षा इतर कामांचे दडपण आहे. त्याचा राग विद्यार्थ्यावर काढणे योग्य नाही.
- वनमाला शं. कुलकर्णी (भावसार चौक, नांदेड)

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com