मनपा शाळांतील विद्यार्थ्यांसाठी जलतरण तलाव मोफत; प्रशासक जी. श्रीकांत यांची माहिती | Latest Marathi News | Breaking Marathi News | Marathi Tajya Batmya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जलतरण तलाव.

Chh. Sambhajinagar : मनपा शाळांतील विद्यार्थ्यांसाठी जलतरण तलाव मोफत; प्रशासक जी. श्रीकांत यांची माहिती

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी मोफत जलतरण तलाव उपलब्ध करून दिला जाणार असून विद्यार्थ्यांना त्यात पोहण्याचा आंनद घेता येणार आहे. या शाळकरी विद्यार्थ्यांना पोहण्याचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिली.

स्मार्ट सिटीच्या माध्यमातून मनपाच्या ५० शाळा स्मार्ट आणि डिजीटल करण्यात आल्या आहेत. मनपा शाळांतील गोरगरीबांचे विद्यार्थी स्मार्ट व्हावेत, त्यांनाही डिजीटल तंत्रज्ञानाची ओळख व्हावी हा उद्देश आहे. विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवण्याचा मानस प्रशासक जी. श्रीकांत यांनी व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांची संख्या कमी असलीतरी मनपाची एकही शाळा बंद करणार नाही.

कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यावर भर दिला जाईल. विद्यार्थ्यांना मोफत सोयी-सुविधा पुरविण्यात येतील. मनपा शाळांतील विद्यार्थ्यांना प्रसिद्ध संगीतकार व गायक शंकर महादेवन् हे संगिताचे धडे दिले जाणार असून विद्यार्थ्यांचे बॅडपथक तयार केले जाणार आहे. त्यासोबतच गरमपाणी भागात असलेल्या महापालिकेच्या जलतरण तलाव मनपा शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत पोहण्याचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले.

नारेगाव शाळा मॉडर्न स्कूल बनविणार

नारेगाव येथील मनपा शाळेत विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असून शाळेचे मैदानही मोठे आहे. त्यामुळे ही शाळा मॉडर्न स्कूल बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांसाठी स्पोर्टस कॉम्प्लेक्स, ट्रॅक, संरक्षण भिंत उभारण्यात येणार आहे.

एका क्लिकवर शाळांतील उपस्थिती कळणार

महापालिकेच्या शाळांत सिसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. त्यामुळे या शाळांच्या प्रत्येक वर्गात किती विद्यार्थी हजर आहेत, गैरहजर किती आहेत. शिक्षकांची उपस्थिती देखील आता एका क्लिकवर कळणार आहे. त्यासाठी स्मार्ट सिटी कार्यालयात कंट्रोलरुम तयार करण्यात आली असून त्यामाध्यमातून शाळांवर नियंत्रण ठेवले जाणार आहे.

दहा हजार विद्यार्थ्यांसाठी मिळाले शूज, सॉक्स

महापालिकेतील विद्यार्थ्यांना सर्व सुविधा पुरविणे शक्य नसल्याने मदतीसाठी आवाहन करण्यात आले आहे. एका दानशूर व्यक्तीने मनपा शाळांतील दहा हजार विद्यार्थ्यांसाठी मोफत शूज आणि सॉक्स देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासोबतच शाळांची विद्यार्थ्यांसाठी असलेली मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने पोर्टल तयार करण्यात आले आहे. या पोर्टलमधील अ‍ॅपमध्ये मागणी नोंदविल्यानंतर मदत करणार्‍यांना तातडीने मदत करता येणार आहे. मदत करणार्‍याचा फोटो आणि लाभार्थींचा फोटो देखील त्यावर दिसणार आहे.

टॅग्स :Muncipal corporation