पंचावन्न वर्षांपुढील नागरिकांची तपासणी करा, विभागीय आयुक्त केंद्रेकरांचे निर्देश

युवराज धोतरे
शुक्रवार, 22 मे 2020

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता दक्ष राहणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्ह्यातील पंचावन्न वर्षांच्या पुढील सर्व नागरिकांची नोंदणी करून त्यांची तपासणी करावी. त्यांचा दररोज नियमित आढावा घ्यावा, असे निर्देश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शुक्रवारी (ता.२२) दिले.

उदगीर (जि.लातूर) : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता दक्ष राहणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्ह्यातील पंचावन्न वर्षांच्या पुढील सर्व नागरिकांची नोंदणी करून त्यांची तपासणी करावी. त्यांचा दररोज नियमित आढावा घ्यावा, असे निर्देश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शुक्रवारी (ता.२२) दिले. येथील पशुवैद्यक महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी पाणीपुरवठा व पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, अतिरिक्त जिल्हाधिकारी अविनाश पाठक, अरविंद लोखंडे, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे, डॉ. सतीश हरिदास, उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यावेळी उपस्थित होते. श्री. केंद्रेकर म्हणाले, कोरोनाच्या संसर्गामुळे पंचावन्न वर्षांपुढील नागरिकांचे मृत्यू होण्याचे प्रमाण हे जास्त आहे. अशा लोकांची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील ५५ वर्षांपुढील नागरिकांची नोंदणी करून घ्यावी. त्यात त्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह यासारखे कोणकोणते आजार आहेत याची माहिती घ्यावी. त्यांची नियमित तपासणी करून त्याचा आढावा घ्यावा जेणेकरून कोरोनाची लागण झालीच तर तत्काळ उपचार सुरू करून असे रुग्ण कोरोनामुक्त करणे सोपे जाईल. यासाठी एखादे ॲप तयार करता आले तर जिल्हाधिकारी यांनी करावे व दररोज त्याचा आढावा घेतला जाईल अशी व्यवस्था करावी. टाळेबंदीत मुभा देऊन सर्व व्यवहार हळूहळू सुरळीत सुरू केल्याने कोरोनाचा संसर्ग वाढेल असे म्हणणे चुकीचे आहे.

कोरोनाबाधिताच्या संपर्कातील २३ जण क्वारंटाइन, सरपंचांना घरात अलगीकरण

याप्रसंगी राज्यमंत्री श्री. बनसोडे म्हणाले, गेल्या महिनाभरापासून उदगीर परिसरात महसूल विभाग, आरोग्य विभाग व पोलिस प्रशासनाने अतिशय चांगले काम केले आहे. जेथे रुग्ण पॉझिटिव्ह निघत आहेत, तेथील परिसर सील करून त्या भागातील नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. उदगीर शहरातील चाचण्यांची संख्या जास्त प्रमाणात असल्याने उदगीरकरांसाठी ही चांगली बाब आहे. प्रशासनाने कामाची गती अशीच ठेवली पाहिजे. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, पालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड, विभागीय पोलिस अधिकारी मधुकर जवळकर, गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण, शहर पोलिस निरीक्षक महेश शर्मा, ग्रामीणचे पोलिस निरीक्षक सोपानराव शिरसाट, पोलिस निरीक्षक बाळासाहेब नरवटे, जळकोटचे तहसीलदार श्री. कुलकर्णी, डॉ. दत्तात्रय पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वाती सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण गोरे आदी यावेळी उपस्थित होते.

गंजगोलाईलाच होती फिजिकल डिस्टन्सिंगची खरी गरज, लातूरकरांना उलगडा

काम करणे जमत नसेल तर घरी बसा
कोरोना संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरात सील करण्यात आलेले रेड झोन व परिसरातील साथरोग नियंत्रण कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. महसूल, पोलिस, नगरपालिका व आरोग्य प्रशासनाने एकत्रित येऊन काम करणे अपेक्षित आहे. ज्यांना काम करणे जमत नसेल त्यांनी घरी बसावे. हलगर्जीपणा केल्यास कारवाई करण्याचा इशारा विभागीय आयुक्त श्री. केंद्रेकर यांनी यावेळी दिला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Take Senior Citizens Medical Check Up, Said Sunil Kendrekar Udgir