esakal | पुरस्काराविना शिक्षक दिन सुना सुना..
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र.

जालना जिल्हा परिषदेकडून दिसेना नियोजन 

पुरस्काराविना शिक्षक दिन सुना सुना..

sakal_logo
By
सुहास सदाव्रते

जालना -  शिक्षकदिनी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविले जाते; मात्र यंदाच्या वर्षीचे पुरस्कार अद्यापही जाहीर झालेले नाहीत. शिक्षक दिन पुरस्काराविना सुना सुना अशी भावना शिक्षकवर्गातून उमटत आहे. 

राज्य शासन शालेय शिक्षण विभागाच्या निकषांनुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना शिक्षकदिनी पुरस्कार देऊन गौरविले जाते. यासाठी पुरस्कार निवड समिती गठित केली जाते. शिक्षक दिन एका दिवसावर आलेला असतानाही जिल्हा प्रशासनाने कुठलीच हालचाल केलेली दिसून येत नाही. विश्वसनीय सूत्रांकडून माहिती अशी, की पुरस्कार निवड समितीची बैठकच झालेली नाही. यामुळे जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार समारंभ शिक्षकदिनी होणार नाही. 

जालना जिल्ह्यात विविध सामाजिक संस्था, संघटनेच्या वतीने शिक्षकांना शिक्षकदिनी गौरविले जाणार आहे. रेड स्वस्तिक सोसायटी, लायन्स क्‍लब यांसह राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह अनेकांनी शिक्षक गौरव समारंभाचे आयोजन केले आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने यापूर्वी नियोजन करायला हवे होते, नंतर गौरव करून उपयोग काय, अशी प्रतिक्रिया शिक्षकवर्गातून उमटत आहे. शिक्षकदिनी शिक्षकांचा पुरस्कार देऊन गौरव करणे शिक्षण विभागाच्या प्रशासनाची जबाबदारी असते. यापूर्वी योग्य नियोजन करून नावे निश्‍चित केली पाहिजेत; पण प्रशासनाची उदासीनता कारणीभूत असल्याचे प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष राजगुरू यांनी सांगितले आहे. यंदा आदर्श शिक्षक पुरस्कार लांबणीवर पडले असून कदाचित पुढील वर्षीच एकदाच दोन वर्षांचे देतील अशी टीकाही शिक्षक संघटना करीत आहे. 


पुरस्कार हा सन्मानाने दिला जावा. शिक्षकदिनी पुरस्कार नाही तर नंतर देऊन गौरव कसा होणार? दिनविशेष असतो याचे भान असायला पाहिजे. वेळ निघून गेल्यावर पुरस्कार म्हणजे थट्टाच आहे. 
- आर. आर. जोशी
विभागीय अध्यक्ष, राज्य आदर्श शिक्षक समिती 

loading image
go to top