टेंबे गणपतीची 122 वर्षांची मिरवणूक, देखाव्याची परंपरा यंदा खंडीत होणार

कमलेश जाब्रस
Tuesday, 25 August 2020

१९०१ साली निजामकालिन राजवटीत स्थापना झालेल्या १२२ वर्षांच्या टेंबे गणपतीची अखंडीत परंपरा यावर्षी कोरोनामुळे खंडीत होणार आहे. त्यामुळे स्थापना मिरवणुक विविध समाजोपयोगी देखावे रद्द करण्यात आले आहेत, तर विधीवत पूजा होऊन श्रींची स्थापना शनिवारी (ता. २९) होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष अनंत जोशी यांनी दिली आहे.

माजलगाव (जि.बीड) : १९०१ साली निजामकालिन राजवटीत स्थापना झालेल्या १२२ वर्षांच्या टेंबे गणपतीची अखंडीत परंपरा यावर्षी कोरोनामुळे खंडीत होणार आहे. त्यामुळे स्थापना मिरवणुक विविध समाजोपयोगी देखावे रद्द करण्यात आले आहेत, तर विधीवत पूजा होऊन श्रींची स्थापना शनिवारी (ता. २९) होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष अनंत जोशी यांनी दिली आहे.

उदगीरात कोरोनाचे सतरा रुग्ण, चाचण्या वाढवण्यावर भर

यावर्षीची मुर्ती ही तीन फुट उंचीची सिंहासनारूढ असणार आहे. नवसाला पावणारा टेंबे गणपती म्हणुन राज्यभर या गणपतीची ओळख आहे. आगळी वेगळी परंपरा असलेल्या या टेंबे गणपतीची दरवर्षी मोठ्या थाटा माटात मिरवणुक काढण्यात येते. परंतु कोरोनामुळे यावर्षी सर्व सांस्कृतीक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. गर्दी टाळण्यासाठी मंडळाच्या वतीने विवीध उपाय केले जाणार असुन सायंकाळच्या आरतीस एकच भाविक असणार आहे.

प्राण प्रतिष्ठापणा वैदिक पध्दतीने कोरोनाचे सर्व नियम पाळून करण्यात येणार आहे. भाविकांसाठी आॅनलाईन दर्शनाची सोय करण्यात आलेली आहे. मंडळाची वेबसाईट तयार करण्यात आली आहे. स्थापनेपासुनच या मंडळाची गणेश मुर्ती ही इकोफ्रेंडली आहे. मंडळाच्या वतीने गरजु विद्याथ्र्यांना वही, पेनसह शालेय साहित्याचे वाटप, कोवीडच्या संकटात गरजुंना महिणाभर जेवण पुरविण्यात आले. वर्षांनुवर्षे परंपरा असल्याने जिल्ह्यात टेंबे गणपतीला वेगळे महत्व आहे.

मिरवणुक होणार नाही
कोरोनाच्या ओढवलेल्या संकटामुळे यावर्षी गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे. स्थापना मिरवणुक व विसर्जन मिरवणुक यावर्षी काढण्यात येणार नाही. पंरपरा खंडीत होउ नये यासाठी गणपतीची विधीवत पुजा सुरू असणार आहे.

फेसबुक पेजवर लाईव आरती
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता व भाविकांना घरूनच आरतीची सोय व्हावी या दृष्टीने मंडळाच्या वतीने फेसबुक पेजवर ढुंढीराज टेंबे गणेश मंडळ या फेसबुक पेजवर रोजची आरती लाईव्ह दाखविण्यात येणार आहे.

अशीही वेगळी परंपरा
आपल्या गणपतीची स्थापना झाल्यानंतर पाच दिवसांनी या टेंबे गणपतीची स्थापना एकदशीला होते तर आपल्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या किंवा तिस-या दिवशी प्रतिपदेला या टेंबे गणपतीचे विसर्जन होते. याला एक वेगळा ईतिहास आहे. निजामकाळात गणपतीची स्थापना करण्याकरीता मिरवणुक काढण्यात आली होती परंतु त्यावेळी निजाम शासनाने परवानगी नसल्याच्या कारणामुळे मिरवणुक अडविली. मंडळाच्या पदाधिका-यांनी हैद्राबाद येथे घोड्यावर प्रवास करून ताम्रपटावर निजाम शासनाची रितसर परवानगी आणली. याकरीता तब्बल चार ते पाच दिवसांचा वेळ गेला त्यामुळे या गणपतीची स्थापना व विसर्जन अशा पध्दतीने केले जाते. विसर्जन मिरवणुकीला रात्रीच्या वेळी अंधार असल्यामुळे व त्यावेळेस विद्युतीकरणाची व्यवस्था नसल्याने टेंबे घेउन मिरवणुक काढली जात असे. यावरून टेंबे गणपती असे म्हणतात तर काही जण नवसपूर्तीही म्हणून आजही विसर्जन मिरवणुकीत टेंबे घेउन सहभागी होतात.

 

(संपादन - गणेश पिटेकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tembe Ganpati Celebrate Its 122 Years Beed News