उन्हाची तीव्रता वाढली !

कैलास चव्हाण
रविवार, 5 एप्रिल 2020

परभणी  तापमान ३८ अंशांवर; लॉकडाउनने व्यवहार ठप्प, नागरिक घामाघूम

परभणी : कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना आता उष्णतेच्या झळा सुरू झाल्या आहेत. आवकाळी पावसानंतर हळूहळू तापमान वाढण्यास सुरवात झाली असून रविवारी (ता. पाच) पारा ३८.०५ अंशांवर पोचला आहे. दरवर्षी या दिवसांत बाजारात मोठी उलाढाल असते. यंदा मात्र, कोरोनामुळे लॉकडाउन असल्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत.

मार्च महिन्याच्या सुरवातील तापमान ३८ अंशांवर पोचले होते. मात्र, अखरेच्या आठवड्यात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस आल्यामुळे तापमानात घसरण झाली होती. दरवर्षी मार्च महिन्याच्या अखरेच्या आठवड्यात पारा चाळीशी पार करत असतो. यंदा मात्र, तसे झाले नाही. एप्रिल सुरू झाला तरी पारा ३८ अंशांच्या आतमध्येच आहे. आता वातावरण पूर्वपदावर येण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे तापमानदेखील वाढत आहे. सकाळपासून उन्हाच्या तीव्र झळा सुरू झाल्या आहेत. दुपारी उन्हाच्या झळा बसत असून रात्रीदेखील उशिरापर्यंत उकाडा वाढला आहे.

लॉकडाउनमुळे सर्वच घरात
सध्या लॉकडाउन सुरू असल्याने सर्वच घरात बसून आहेत. त्यामुळे बाहेर उन्हात जाण्याचा प्रश्न येत नाही. परंतु, घरात उकाडा असह्य होत आहे. त्यात भारनियमनाचा त्रास होत असल्याने ग्रामीण भागात जनतेचे हाल होत आहेत. अनेक ग्रामस्थांनी थेट शेतात जाऊन राहणे पसंत केले आहे. बहुतांष ग्रामस्थ दिवसभर शेतात राहात आहेत.

हेही वाचा - लॉकडाउनमध्ये घरफोडी !

कोट्यवधींची उलाढाल ठप्प
दरवर्षी मार्च महिन्यापासून उन्हाळ्याच्या बाजारपेठेत मोठी उलाढाल सुरू होत असते. उन्हापासून बचाव करणाऱ्या साधनांनी बाजारपेठ सजलेली राहाते. बाजारपेठांमध्ये उन्हापासून संरक्षण करणाऱ्या सनगॉगल्स, टोपी, रुमाल आदी वस्तूंची गर्दी होते. याबरोबरच विविध शीतपेयांची दुकाने लागतात, सर्वच रस्त्यांवर रसवंत्या सुरू असतात. कपड्यांसह इलेक्ट्रॉनिक दुकानांतदेखील गर्दी होते. फ्रीज, एअर कूलर, फॅन यांनाही मागणी होऊ लागते. उन्हाळ्यात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात भासते. त्यामुळे पाणी साठवण्यासाठी टाकीची गरज असल्याने सध्या पाण्याच्या टाक्यांचीदेखील विक्री वाढते. अशी एकदंरीत बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल वाढते. यंदा मात्र, कोरोनामुळे लॉकडाउन सुरू आहे. त्याचा परिणाम या सर्व गोष्टींवर झाला आहे. उकाडा वाढू लागल्याने पंखे, कूलरची गरज आहे. ज्यांच्याकडे कूलर आहेत, त्यांनी ते सुरू केले आहेत. मात्र, अनेकांचे कूलर नादुरुस्त झालेत. कुणाला नवीन कूलर घ्यायचे, कुणाचा पंखा नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे अनेकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांवर घामाघूम होण्याची वेळ आली आहे.

तापमान ४१ अंशांपर्यंत वाढणार
येत्या काही दिवसांत तापमान वाढणार असून पारा ३९ ते ४१ अंशांपर्यंत जाईल, अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाने दिली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The temperature of Parbhani at 38 degrees,parbhni news