अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी एकास दहा वर्षे सक्तमजुरी, सहा हजार रुपये दंड

तानाजी जाधवर
Wednesday, 28 October 2020

अल्पवयीन मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढुन वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कृष्णा दत्तु शिंदे यास दहा वर्षे सक्तमजुरी व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती आर.जे.रॉय यानी सुनावली.

उस्मानाबाद : अल्पवयीन मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढुन वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कृष्णा दत्तु शिंदे यास दहा वर्षे सक्तमजुरी व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती आर.जे.रॉय यानी सुनावली. १४ जुलै २०१७ रोजी पीडित मुलीच्या वडीलांनी बेंबळी पोलीस ठाण्यात हजर राहुन त्यांच्या अल्पवयीन मुलीस आरोपीने लग्नाचे आमिष दाखवुन पळवुन नेले. त्यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मुलाच्या निधनाची बातमी ऐकताच आईने सोडला प्राण, एकाच सरणावर दोघांचे अंत्यसंस्कार

या प्रकरणाच्या तपासात आरोपीने पीडितेस प्रेमाच्या जाळ्यात ओढुन वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले. तसेच १३ व १४ जुलै रोजीच्या मध्यरात्री अल्पवयीन मुलीला आरोपीने पीडितेस फुस लावुन सातारा, पुणे येथे घेऊन जाऊन त्या ठिकाणी तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले होते. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस.एल.जमदाडे यांनी पूर्ण करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती आर.जे. रॉय यांच्या न्यायालयात पूर्ण झाली.

या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने १७ साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणात पैरवी कर्मचारी म्हणून सहायक पोलीस उपनिरीक्षक एम.एस.पवार यांनी काम पाहिले. या प्रकरणामध्ये पीडिता, पीडितेचे वडील, शाळेचे मुख्याध्यापक, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. या प्रकरणात आलेला ठोस तोंडी पुरावा व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अॅड. सचिन सूर्यवंशी यानी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरला.न्यायालयाने आरोपी कृष्णा दत्तु शिंदे (धारुर ता. उस्मानाबाद) यास पोक्सो कायद्यानुसार दहा वर्षे सक्तमजुरी व सहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten Years Life Imprisonment Of Accused Osmanabad News