
सोनखेड (ता.निलंगा) येथील कोल्हापुरी पद्धतीच्या (जुन्या पध्दतीचा वसंत बंधारा) बंधाऱ्याचे दारे वेळेत उघडले नसल्यामुळे तेरणा नदीने आपला चक्क प्रवाहच बदलला.
निलंगा (जि.लातूर) : सोनखेड (ता.निलंगा) येथील कोल्हापुरी पद्धतीच्या (जुन्या पध्दतीचा वसंत बंधारा) बंधाऱ्याचे दारे वेळेत उघडले नसल्यामुळे तेरणा नदीने आपला चक्क प्रवाहच बदलला. जवळपास अडीचशे फुट नदीने नवीन प्रवाह तयार केल्याने येथील जवळपास पन्नास एकर जमिनीवरील माती खरडून गेली आहे. त्या ठिकाणी कमरेपर्यंत खड्डे पडले आहेत. त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आता रब्बीची पेरणी कुठे करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
माकणी (ता.लोहारा) येथील निम्न तेरणा प्रकल्प पूर्णतः भरून ओव्हरफ्लो झाल्याने पाणी तेरणा नदीला सोडण्यात आल्यामुळे पाण्याचा प्रवाह दुप्पट झाला होता. शिवाय नदीकाठच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोनखेड येथील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचे दारे न काढल्यामुळे नदीने चक्क आपला प्रवास बदलला आहे. या गावात जवळपास अडीचशे फूट अंतर नवीन प्रवाह तयार झाला आहे. यामुळे छोट्या शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जवळपास ५० एकर शेती वाहून गेली आहे.
कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करून वाचवा, छत्रपती संभाजीराजेंचे आवाहन
त्यामुळे या शेतकऱ्यांनी आता रब्बीची पेरणी कोठे करावे असा प्रश्न निर्माण झाला असून नवीन प्रवाहामुळे आपली शेती कुठे आहे. याचा पत्ताही शेतकऱ्यांना लागत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या नवीन प्रवाहामुळे कमरेपर्यंत मोठे खड्डे पडले असून जुन्या पद्धतीच्या बंधाऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. जुन्या पद्धतीचा बंधारा असल्यामुळे गेट काढण्यास व टाकण्यास मोठा विलंब लागतो. क्रेनच्या साह्याने गेट टाकले जातात अथवा काढले जातात. या बंधाऱ्यावर दरवाजे न काढल्यामुळे अखेर नदीच्या पाण्याच्या दाबामुळे नवीन प्रवाह तयार झाला व त्या ठिकाणची पिके तर वाहून गेली परंतु शेतकऱ्यांच्या शेतातील माती वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.
या ठिकाणी राज्याचे मदत व पुर्नवसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पाहणी केली. अक्षरशः शेतकऱ्यांना आपली शेतीत गायब झाल्यामुळे अश्रू अनावर झाले. अनेकांनी मोठ मोठ्याने हंबरडा फोडून त्यांच्यासमोर आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. यावेळी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनीही तेरणा नदीकाठच्या पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळे नदीकाठी मोठ्या प्रमाणात जमिनीवरील माती वाहून गेली असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ओढे व नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवरील माती वाहून गेल्याने रब्बीच्या पेरणीला शेतकऱ्यांना अडचण झाली आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांचे पंचनामे व सर्वेक्षण करून विशेष पॅकेज देण्यात यावी अशी मागणी श्री.निलंगेकर यांनी मदत व पुर्नवसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे.
जमिनीवरील माती वाहून गेली, विशेष मदतीची गरज
अतिवृष्टीमुळे तालुक्यातील मांजरा व तेरणा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला होता. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्याची सोयाबीनचे काढून ठेवलेल्या गंजी वाहून गेले आहेत. शिवाय जमिनीवरील मातीत वाहून गेल्याने आता शेतकऱ्यांनी रब्बीची पेरणी कुठे करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याच्या प्रचंड दाबाच्या प्रवाहामुळे शेतामध्ये मोठ-मोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी शेतीला ओढ्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून शेतीच्या दुरूस्तीसाठी शासनाकडून विशेष मदत करण्याची गरज आहे.
संपादन - गणेश पिटेकर