कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करून वाचवा, छत्रपती संभाजीराजेंचे आवाहन

हरी तुगावकर
Monday, 19 October 2020

शेतकऱ्यांना मदत करण्याची केंद्र व राज्य शासनाची जबाबदारी आहे. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करून त्यांना वाचवा, असे आवाहन खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सोमवारी (ता.१९) लातूर येथे पत्रकार परिषदेत दिली.

लातूर : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अतिवृष्टीचे संकट कोसळले आहे. शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटात त्याला मदत केली नाही तर तो आयुष्यातून उठेल. शेतकऱ्यांना मदत करण्याची केंद्र व राज्य शासनाची जबाबदारी आहे. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करून त्यांना वाचवा, असे आवाहन खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सोमवारी (ता.१९) येथे पत्रकार परिषदेत दिली.

शरद पवार कृषी विधेयकावर बोलले; मालाच्या किंमतीची गॅरंटी नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. रयतेचे दुःख ऐकून घेणे ही छत्रपतींची जबाबदारी आहे. त्यामुळे मी हा दौरा काढला आहे. शेतकऱ्यांच्या वेदना सरकार दरबारी मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करावे लागणार आहे. सरकारने ५० हजार रुपयाची मदत करण्याची गरज आहे. रब्बीच्या पेरणीलाही पैसा नाही. शेतकऱ्यांनी कर्ज काढले तर त्याची जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे, असे संभाजीराजे म्हणाले. शेतकऱ्यांनी पिकविमा उतरवला आहे.

पण आता संकटाच्या काळात कंपन्या विमा देण्यास तयार नाहीत. तांत्रिक कारणे पुढे करीत टाळाटाळ सुरु आहे. विमा उतरवताना घरी येतात आणि आता मात्र पळ काढत आहेत. सरकारने या विमा कंपन्यांना कडक शब्दात मदत करण्यासाठी सांगण्याची गरज आहे. शासनाने ओला दुष्काळ जाहिर केला पाहिजे. केंद्र व राज्य सरकारने संयुक्तरीत्या मदत करण्याची गरज आहे. या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे ते म्हणाले. रयतेच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे. ऐकायचे की नाही त्यांनी ठरवावे, असेही त्यांनी सांगितले.

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शरद पवार म्हणाले, पक्षाबद्दल विश्वास वाटत असेल तर काय करायचे!

महाराष्ट्राची ताकद दाखवावी लागेल
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. पण कोणावर अन्याय होता कामा नये अशी आमची भूमिका आहे. गरज पडली तर घटनेत बदल नव्हे तर दुरुस्ती महत्त्वाची आहे. कायद्यात सुधारणा होऊ शकते. न्यायालयात शासनाने जोमाने बाजू मांडण्याची गरज आहे. दुसरीकडे पंतप्रधानाना भेटून त्यांच्यासमोर मराठा समाजाच्या व्यथा सांगण्याची गरज आहे. या करीता राज्यातील सर्वपक्षीय खासदारांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. सर्वांनी एकत्र येवून महाराष्ट्राची ताकद दाखवावी, असे आवाहनही छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी बोलताना केले.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Any How Condition Save Farmers Through Aids, Sambhajiraje's Appeal