संप सुरूच; लुटीवर नियंत्रण नाहीच | Beed | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST Bus

बीड : संप सुरूच; लुटीवर नियंत्रण नाहीच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, या मागासाठी सुरु केलेला संप गुरुवारी (ता. ११) आठव्या दिवशीही सुरुच होता. बस बंद असल्याने खासगी वाहनधारकांनी दुप्पट तिकीटदर करून सुरु केलेल्या प्रवाशांच्या लुटीवर यंत्रणेने काहीही नियंत्रण आणले नाही हे विशेष.

आता बीडमध्ये बसस्थानकातून लांब पल्ल्याच्या खासगी बस - जीप प्रवासी भरत आहेत. या ठिकाणी वाहतुकीशी संबंधित यंत्रणेचे अधिकारी असतानाही दुप्पट तिकीट दर आकारले जात असल्याने यंत्रणा नेमके करतेय काय? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला. राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी गुरुवार (ता. चार) ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशीपासून संप सुरु झाला.

हेही वाचा: भारतात अफ्रिकेतील मलावी आंबे दाखल

परिणामी जिल्ह्यातील आठही आगारांतून होणारी बससेवा ठप्प आहे. रोज १०२५ फेऱ्या रद्द होत असल्याने एक लाख ६० हजार किलोमीटर प्रवासातून बसला मिळणारे रोजचे ५५ लाख रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. परिवहन महामंडळाचे कर्मचारी नियमित आंदोलन करत आहेत.

दरम्यान, बससेवा बंद असल्याने खासगी प्रवासी वाहतूकदारांनी आता प्रवाशांच्या खिशावर डल्ला सुरु केला आहे. बीड - लातूर, बीड - औरंगाबाद, बीड - पुणे, बीड - सोलापूर, बीड - जालना या लांब पल्ल्यांसाठी पूर्वीच्या तिकीट दरापेक्षा आता दुप्पट तिकीट घेतले जात आहे. एकीकडे वाहतुकीशी संबंधित यंत्रणेच्या नियंत्रणात बसस्थानकातून खासगी प्रवासी वाहतूक सुरु झाली असली तरी त्यांच्या डोळ्यादेखत अधिकचे प्रवास भाडे आकारले जात असताना यंत्रणा डोळे झाकून आहे.

दरम्यान परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीच्या समर्थनार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चा काढला. कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द करावे, परिवहन मंत्र्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा आदी मागण्याही करण्यात आल्या. प्रदेश उपाध्यक्ष अशोक तावरे, जिल्हाध्यक्ष श्रीराम बादाडे, वैभव काकडे, राजेंद्र मोटे, सुमंत धस, सदाशिव बिडवे, महिला जिल्हाध्यक्ष वर्षा जगदाळे, रेखा अंबुरे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष शैलेश जाधव, नितीन सांगळे, जुबेर सिद्दीकी, श्रीकृष्ण गायके, अंकुश गायकवाड, आदर्श तरकसे आदींनी सहभाग घेतला.

loading image
go to top