लातूर : बोरोळ्यात घरफोडीत, साडेचार लाखांचा ऐवज लंपास

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 December 2019

साखरझोपेत असताना घडलेल्या या घरफोडीमुळे परिसरात खळबळ उडाली असून ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बोरोळ (जि. लातूर) - येथे गुरुवारी (ता. पार) पहाटे अडीच ते साडेतीनच्या सुमारास घरफोडीच्या दोन घटना घडल्या असून, यामध्ये नऊ तोळे सोने व 35 तोळे चांदी, तर 65 हजार 600 रुपये रोख रक्कम तसेच एक दुचाकी असा अंदाजे साडेचार लाखांचा ऐवज घेऊन अज्ञात चोरटे फरारी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 

याबाबत माहिती अशी की, गुरुवारी पहाटे गावाच्या पश्‍चिमेला गावकुसाबाहेर असलेल्या व्यंकट इरप्पा म्हेत्रे यांच्या घराच्या छतावरून अज्ञात चोरट्यांनी मोठ्या शिताफीने वाड्यात प्रवेश करीत येथील खोलीचे दार उघडून लोखंडी कपाटातील सहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने, त्यामध्ये सोनसाखळी, कानातील डूल, अंगठ्या व इतर तसेच 35 तोळे चांदी व दहा हजार सहाशे
रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे.

हेही वाचा : तेजासाला करायचे होते मॉडेलिंगमध्ये करीअर पण त्यापूर्वीच... 

देविदास तुळशीराम मुळखेडे यांच्या घरातील लोखंडी पेटीतील सोयाबीनचे 40 हजार व बैलविक्रीचे 15 हजार अशी एकूण 55 हजारांची रोख रक्कम व तीन तोळे सोने एवढा ऐवज व परत जाताना बोरोळ - देवणी या मुख्य रस्त्यावर अगदी शेवटी असलेल्या उमाकांत नरसिंग राजोळे यांच्या घराच्या अंगणात असलेली दुचाकी (एपी-9-2959) घेऊन फरारी होण्यात चोरटे यशस्वी झाले. साखरझोपेत असताना घडलेल्या या घरफोडीमुळे परिसरात खळबळ उडाली असून ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदरील घटनेची माहिती सकाळी मिळताच बीट अंमलदार विनायक कांबळे, सर्फराज गोलंदाज, किर्तेश्वर बनाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून व्यंकट म्हेत्रे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

पोलिसांपुढे तपासाचे आव्हान 

बोरोळपासून कर्नाटकच्या सीमेचे अंतर केवळ तीन किमी असून चोरट्यांना फरारी होण्यास व लपून बसण्यासाठी मांजरा नदीकाठचा परिसर सोयीचा ठरत असल्याने आंतरराज्य टोळीचा सहभाग असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यापूर्वीही मकरंद देवणे यांच्या घरीही अशीच घरफोडी झाली होती; मात्र घटनेस चार वर्षांचा कालावधी उलटला तरी अद्याप त्याचा तपास
लावण्यात पोलिसांना यश न आल्याने पोलिसांपुढे तपासाचे मोठे आव्हान असणार आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft of 4.5 lakh rupees at Latur