esakal | लातुरात सराफा व्यापाऱ्याच्या घरून दागिन्यांसह पिस्टलची चोरी
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

लातुरात सराफा व्यापाऱ्याच्या घरून दागिन्यांसह पिस्टलची चोरी

sakal_logo
By
रत्नाकर नळेगावकर

अहमदपूर (लातूर): येथील सराफा व्यापाऱ्याच्या घरातून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व एक पिस्टलची चोरी करून जवळपास २१ लाख रुपयांचा माल लंपास केल्याची घटना घडली आहे. शहरातील गायकवाड कॉलनी रस्त्यावरील व्यंकटेश नगर येथील सराफा व्यापारी संजय गोविंदराव गोटमवाड यांचे सराफा बाजारात न्यू विजय ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. संजय गोमटवाड यांची मुले शिक्षणासाठी पुणे येथे असल्याने पत्नी व मुले पुणे येथे राहत आहेत. सध्या अहमदपूर येथील निवासस्थानी ते एकटेच राहतात. १७ जून रोजी पहाटे पाच वाजता दुकानातील सोन्या चांदीचे दागिने घरातील कपाटात ठेवून ते पुणे येथे कुटुंबास भेटण्यासाठी गेले. शनिवारी (ता. १९) सकाळी नऊच्या सुमारास अहमदपूर येथील आपल्या निवासस्थानी आले असता घराच्या सुरक्षा दरवाजाचा कोंडा तुटलेला तर दुसऱ्या लाकडी दरवाज्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केल्याचे निदर्शनास आले.

शिवाय कपाटातील २० ग्रॅम वजनाच्या दोन बोरमाळ (किंमत ९० हजार), ५५ ग्रॅम वजनाचे अष्टपैलू मणी मंगळसूत्र (४ लाख २७ हजार), ७५ ग्रॅम वजनाचे कानातील झुमके फुले दहा जोड (३ लाख ३७ हजार ५००), ३१ ग्रॅम वजनाचे दोन नेकलेस (एक लाख, ३९ हजार ५००), २७ ग्रॅम वजनाचे सात वेढ (एक लाख २१ हजार ५००), ५६ ग्रॅम वजनाचे पेन्डाल (दोन लाख ५२ हजार) वीस ग्रॅम वजनाचे एक लॉकेट (९० हजार), ५४ ग्रॅम वजनाचे नऊ जोड फुलं (दोन लाख ४३ हजार), २७ ग्रॅम वजनाचे सेव्हन पीस, सरपाळे व नथनी (एक लाख ६६ हजार ५००), ४३ ग्रॅम वजनाचे कानातील अकरा रिंग जोड (एक लाख ९३ हजार ५००) व एक ०.३२ पिस्टल असा एकूण २१ लाख एक हजार रुपये किमतीचा माल चोरट्यांनी लंपास केला आहे.

हेही वाचा: कृषी विभागाच्या धाडीत 77 पाकिटे बोगस कांदा बियाणे जप्त

या संदर्भात अहमदपूर पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक नानासाहेब लाकाळ करीत आहेत. दरम्यान, श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. श्वानाने घराला लगत असलेल्या नगरातील खुल्या जागेतील काळा मारुती मंदिर पर्यंत मार्ग दाखवला.

आठ दिवसांत तीन चोऱ्या
मागील आठ दिवसांत शहरातील विविध भागात तीन ठिकाणी चोरी झाल्याच्या घटना घडल्याने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वेळीच पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

loading image